सात लाखांच्या लूटप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 05:01 PM2019-04-14T17:01:26+5:302019-04-14T17:03:59+5:30
यावल येथील घटना: दोन जणांना अटक, तर दोघे फरार
यावल : येथील सराफ श्रीनिवास नंदकिशोर महालकर यांच्यावर शनिवारी रात्री चाकूने वार करून सुमारे आठ लाखांचा ऐवज लुटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चारपैकी दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असूनल अन्य दोघे फरार आहेत.
शहरातील समर्थ ज्वेलर्सचे मालक श्रीनिवास नंदकिशोर महालकर हे शनिवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास त्यांचे ज्वेलरी दुकान बंद करून दुचाकीने घरी जात होते. तेव्हा त्यांच्या घराजवळच त्यांचे वाहन अडवत चौघा चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला व त्यांच्याजवळील बॅग हिसकावून पोबारा केला. बॅगेत पाच लाख ६५ हजार ६०० रुपयांचे १८६ ग्रॅम सोने, दोन लाख २३ हजार ६०० रुपयांची ७.५७० किलो ग्रॅम चांदीचे दागिने असा सात लाख ८६ हजारांचा ऐवज होता. त्यांची आरडाओरड ऐकून नागरिकंनी चोरट्यांचा पाठलाग करत जैनाबाद, जळगाव येथील आकाश सपकाळे यास पकडले होते.
याप्रकरणी नंदकिशोर महालकर यांनी फिर्याद दिली. त्यावरून जळगाव येथील आकाश सपकाळे, गौरव कुवर, तर यावलचे चेतन कोळी व यश उर्फ गोलू पाटील या चार चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आकाश सपकाळे व चेतन कोळी यांना पोलिसांनी अटक कली आहे. पो. नि. डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुजीत ठाकरे हे. कॉ. संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.