सात बैलांचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू, सात बैल जप्त, ट्रक चालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:17+5:302021-08-12T04:21:17+5:30
रावेर : उत्तर प्रदेशातून बंगळुरू येथे ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येणाऱ्या चौदापैकी सात बैलांचा मृत्यू झाला. चोरवड सीमा तपासणी नाक्यावर ...
रावेर : उत्तर प्रदेशातून बंगळुरू येथे ट्रकमध्ये कोंबून नेण्यात येणाऱ्या चौदापैकी सात बैलांचा मृत्यू झाला. चोरवड सीमा तपासणी नाक्यावर सात बैल जप्त करण्यात आले. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, उत्तर प्रदेशातून १४ बैल ट्रक (युपी-११-एटी-१४६९)मध्ये निर्दयतेने कोंबून व डोके, मान व पाय बांधून आगळीक करीत अमानुषपणे कत्तलीसाठी वाहतूक करीत असताना, ट्रक चालक राजा फिरोज शेख सिद्दीकी वय २२, रा.बुठाना, ता.बुठाना, जि.मुजफ्फपुर (उ. प्र.) हा चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत प्रल्हाद महाजन यांना आढळून आले. त्यांनी रावेर पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शीतलकुमार नाईक फौजदार मनोज वाघमारे, महेंद्र सुरवाडे, नितीन डांबरे, सुरेश मेढे, सुकेश तडवी, उमेश नरवाडे, गाडीलोहार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पिवळ्या फटीत झाकलेल्या ५ लाख रु. किमतीच्या ट्रकसह तीन लाख ६४ हजार रुपये किमतीचे गुदमरून मृत पावलेले सात बैल तर तोंड, मान व पायांना बांधून अमानुषपणे आगळीक करून, घायाळ अवस्थेतील जिवंत सात बैल जप्त करण्यात आले.
एकूण ८ लाख ६४ हजार रु. किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळीच ट्रक चालक आरोपी राजा फिरोज शेख सिद्दीकी (वय २२ रा.बुठाना, जि.मुजफ्फपूर) यास अटक केली. ही घटना ७ रोजी दुपारी चोरवड सीमा तपासणी नाक्यावर घडली. मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत प्रल्हाद महाजन यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ट्रक चालकासोबतचा साथीदार आरोपी पसार झाला. दरम्यान, जाणाऱ्या सात बैलांची सुदैवाने सुटका करून, त्यांना कुसुंबा (जळगाव) येथील बाफना गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.