जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे सात ट्रॅक्टर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:30 AM2019-01-31T11:30:22+5:302019-01-31T11:31:39+5:30
रात्री ११ वाजता गुन्हा दाखल
जळगाव : महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले तब्बल सात ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी बुधवारी रात्री ११ वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशाने राबविलेल्या मोहिमेत महसूल विभागाने २६ जानेवारीपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडून ते जिल्हाधिकारी कार्यालयात लावले होते.
यात चार ट्रॅक्टर हे विना क्रमांकाचे होते तर तीन ट्रॅक्टरवर क्रमांक होते. हे ट्रॅक्टर गायब झाल्याचे बुधवारी लक्षात आले.
त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तलाठी सचिन माळी व रमेश ठाकूर वंजारी यांनी स्वतंत्रपणे सात फिर्याद दिल्या. वंजारी यांनी तीन तर माळी यांनी चार फिर्यादी दिल्या.
त्यात एम.एच.१९ सी.४५०२, एम.एच.१९ सी.४५५१ व एम.एच.१९ बी.जे.७९७६ या क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर तर विना क्रमांकाचे चार ट्रॅक्टर पळविल्याने अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात सतत अधिकाऱ्यांचा वावर असतो तसेच उपोषण, मोर्चा, आंदोलनासाठी पोलिसांचाही बंदोबस्त असतो. सतत वर्दळ असतानाही यंत्रणेच्या डोळ्यादेखत ट्रॅक्टर पळवून नेण्याची हिंमत वाळू माफियांनी केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय देखील सुरक्षित नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.
यापूर्वी देखील डंपर व ट्रॅक्टर चोरीचे प्रकार झाल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याची चर्चा होत आहे.
वाळूमाफियांची वाढती दादागिरी
जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे वाहने पळवून नेण्याची हिमत वाळूमाफियांनी केली आहे. याआधी तहसील कार्यालयाच्या आवारातूनही ट्रॅक्टर पळविण्यात आले होते. तेव्हा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. गेल्या महिन्यातही जिल्हाधिकारी कार्यालयातून डंपर पळविण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाळू चोरीला आळा बसावा यासाठी प्रशासनाने गुन्हा दाखल न करता दंडात्मक कारवाइचा फार्म्युला अवलंबला होता, त्यानंतर आता पुन्हा गुन्हा दाखल करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईचा आकडा मोठा असल्याने माफियांना गुन्हा दाखल झालेले सोयीचे वाटू लागले आहे.