दोन वृक्ष तोडण्याची परवानगी असताना तोडले गेले सात वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:12+5:302021-06-25T04:13:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ख्वॉजामिया दर्गा परिसरातील गणगोपी अपार्टमेंटमधील दोन वृक्ष तोडण्याची परवानगी याठिकाणच्या नागरिकांनी घेतली असताना, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील ख्वॉजामिया दर्गा परिसरातील गणगोपी अपार्टमेंटमधील दोन वृक्ष तोडण्याची परवानगी याठिकाणच्या नागरिकांनी घेतली असताना, या अपार्टमेंटमधील नागरिकांनी तब्बल सात वृक्ष तोडले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मनपा प्रशासनाने शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह रहिवाशांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरवर्षी पावसाळ्याचा तोंडावर धोकेदायक वृक्षांच्या फांद्या किंवा धोकेदायक वृक्ष तोडण्यासाठी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज केले जात असतात. याबाबत मनपा प्रशासनदेखील कोणतीही पडताळणी न करताच परवानगी देत असते. दरम्यान, गणगोपी परिसरातील दोन वृक्ष तोडण्यासाठी गजानन मालपुरे यांनी मनपाकडे परवानगी मागितली होती. याठिकाणी निलगिरीचे आठ वृक्ष होते. नागरिकांनी सर्व आठ वृक्ष तोडण्याची परवानगी मनपाकडे मागितली होती. त्यापैकी दोन वृक्षच इमारतीकडे झुकलेले होते. त्यामुळे मनपा पर्यावरण विभागाने केवळ दोन वृक्ष तोडण्याची परवानगी नागरिकांना दिली. मात्र, याठिकाणच्या रहिवाशांनी दोन वृक्ष न तोडता बाकीचे इतर सात वृक्ष तोडले आहेत. याबाबत मनपा पर्यावरण विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सात वृक्ष तोडण्यात आल्याचे आढळून आले. मनपाने याबाबत पंचनामा केल्यानंतर मनपाची परवानगी न घेताच वृक्षांची कत्तल केल्यामुळे गजानन मालपुरे यांच्यासह रहिवाश्यांनादेखील नोटीस बजाविण्यात आली आहे.
वृक्ष प्राधीकरण समितीची आज बैठक
शहरातील वृक्षांसह पर्यावरणाचा आढावा घेण्यासाठी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांची शुक्रवारी महापालिकेत बैठक होणार आहे. या बैठकीत परवानगी न घेताच वृक्ष तोडल्याप्रकरणी काही जणांच्या सुनावणीदेखील होणार असून, या बैठकीत गणगोपी अपार्टमेंटमधील वृक्ष तोडल्याप्रकरणी संबंधितांवर दंडदेखील ठोठावला जाण्याची शक्यता आहे. यासह शहरातील इतर तक्रारींबाबतदेखील सुनावणी होणार आहे.