पिंपळकोठा अपघातापेक्षा किनगावच्या अपघाताची भीषणता अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:17 AM2021-02-16T04:17:45+5:302021-02-16T04:17:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यावलजवळ झालेल्या अपघातात दोन चिमुरड्यांसह पंधरा जण ठार झाल्याच्या घटनेने दोन वर्षांपूर्वी महामार्गावरील पिंपळकोठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यावलजवळ झालेल्या अपघातात दोन चिमुरड्यांसह पंधरा जण ठार झाल्याच्या घटनेने दोन वर्षांपूर्वी महामार्गावरील पिंपळकोठा येथे झालेल्या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. या अपघातात ९ जण ठार तर ८ जण जखमी झाले होते. महामार्गावर असलेल्या खड्ड्यात ट्रकचे चाक गेले व त्यात ट्रकच्या स्टेअरींगचा एक्सल तुटल्याने हा ट्रक समोरून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळीवर आदळला. त्यात ९ जण जागीच ठार झाले होते.
दैव बलवत्तर म्हणून सिमरन भानुसा ही दीड वर्षांची मुलगी बचावली होती. २३ डिसेंबर २०१९ रोजी हा अपघात झाला होता. पिंपळकोठा गावानजीक झालेल्या या अपघाताला महामार्गावरील खड्डाच जबाबदार होता, असे निष्पन्न झाले होते. मात्र, हा खड्डा जितका जबाबदार होता, त्याचपध्दतीने काळीपिवळीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नसते तर इतक्या लोकांचा जीवच गेला नसता. ९ ठार व ८ जखमी असे एकूण १७ प्रवासी या वाहनात होते. या वाहनाची प्रवासीक्षमता सात प्रवाशांची होती. त्या घटनेनंतर आता पुन्हा किनगाव, ता.यावलनजीक पपई घेऊन जात असलेला ट्रक खड्ड्यामुळे पलटी झाला झाला व त्यात १३ मजूर व त्यांचे २ मुले जागीच ठार झाले. या ट्रकमध्येही १८ मजूर व २ मुले असे २० जण होते. जिल्ह्यात रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व खड्डे हे अपघात व मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत.