‘म्युकोरमायकोसिस’ गांभीर्य सर्वप्रथम ‘लोकमत’ने आणले समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:24+5:302021-05-10T04:16:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकोरमायकोसिस या विकाराचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकोरमायकोसिस या विकाराचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचा मुद्दा समोर येत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनीदेखील याविषयी उपाययोजनांविषयी मुद्दे मांडले आहेत. हा विषय आता राज्यात समोर येत असला तरी याची गांभीर्यता सर्वप्रथम ‘लोकमत’ने गेल्या महिन्यातच मांडली होती. याविषयी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी याविषयी वेळीच दक्षता घेण्याचेही आवाहन केले होते.
कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढून दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण अधिक वाढले. हा नवा स्ट्रेन असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नवीन लक्षणे, नवीन विकार, संसर्गाचे वाढते प्रमाण यातून हा नवा स्ट्रेन असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातून समोर येत आहे. त्यात कोरोनातून बरे झालेले अनेक रुग्ण नवीनच तक्रार घेऊन डॉक्टरकडे येऊ लागले. याला म्युकोेरमायकोसिस संबोधले जात आहे. कोरोनामुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्याने या फंगलचे संक्रमण वाढताना दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या आजाराचे आता राज्यात रुग्ण समोर येत असल्याचा मुद्दा प्रकर्षाने वैद्यकीय क्षेत्रातून मांडला जात आहे. यात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनीदेखील एका खाजगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना या आजाराविषयी उपाययोजनांवर चर्चा केली.
राज्यात आता हा मुद्दा समोर आला असला तरी जळगावातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी याविषयी गेल्या महिन्यातच समोर आणला होता, तसेच याविषयी ‘लोकमत’ने ४ एप्रिल रोजी ‘जळगावात कोरोनानंतर म्युकोरमायकोसिसचे रुग्ण वाढ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.
जळगावात गेल्या एक ते दीड महिन्यापासूनच या आजाराचे रुग्ण समोर येत असल्याचे डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले. याविषयी त्यांनी जे मुद्दे मांडले होते व ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यातून अनेक ठिकाणांहून डॉ. धर्मेंद्र पाटील यांना विचारणा झाली, तर काहींनी रोषही व्यक्त केला होता. मात्र, आता हे रुग्ण राज्यभरात वाढत असल्याने याविषयी गांभीर्य अधोरेखित होत आहे.
डोळे, कान, नाक, घसा याविषयी निगडित असलेल्या या आजाराचे रुग्ण त्या- त्या डॉक्टरांकडे जात असल्याने ही बाब त्यांच्या निदर्शनास येत आहे. जळगावातही नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पाटील यांनी म्युकोरमायकोसिसविषयी सावध केले होते. विशेष म्हणजे चीनमध्ये सर्वप्रथम नेत्ररोगतज्ज्ञांनीच कोरोनाविषयी सावध केले होते.