बाप नावाची सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:03+5:302021-06-18T04:12:03+5:30

लेखक - डॉ. मिलिंद बागूल, जळगाव. बाप आपल्या प्रत्येकाच्या जीवनातले महत्त्वाचे अंग, अनेकदा चर्चेतून आमची पिढी आणि आजची पिढी ...

A shadow called the father | बाप नावाची सावली

बाप नावाची सावली

Next

लेखक - डॉ. मिलिंद बागूल, जळगाव.

बाप आपल्या प्रत्येकाच्या जीवनातले महत्त्वाचे अंग, अनेकदा चर्चेतून आमची पिढी आणि आजची पिढी यातली तुलना केली जाते आणि जुनी पिढी किती चांगली आणि संस्कारी होती, याबद्दल चर्चा केली जाते. आई-बाप कधीही वेगवेगळे केले जाऊ शकत नाही. साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत आणि लिहिणाऱ्यांनी लिहिताना आईला झुकतं माप दिलं. तिचं मातृत्व आणि तिचा त्याग हा लक्षात घेण्यासारखाच आहे; पण बापाच्या कष्टानं, कर्तृत्ववान आणि कुटुंबवत्सलतेने कुटुंबाची होणारी वाटचाल नाकारता येणार नाही. मुला-मुलींच्या आयुष्याची जडणघडण योग्य प्रकारे होण्यासाठी त्याची चालणारी धडपड ही कुणाला दिसत जरी नसली तरी त्याच्या काळजापासून लेकरांसाठी त्याची चालणारी धावपळ सर्वश्रुत असतेच. प्रत्येक बाप आपल्या लेकराला सुखी आणि आनंदी पाहण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी दिवसाढवळ्या देखील पाहत असतो.

लेकराच्या आयुष्याला बहर यावा यासाठी, त्याने सुखाच्या त्यागाची पेरणी केलेली असते. कुटुंबातले संस्कार आणि मैत्रीची संगत याचा सारासार विचार करता बापाच्या जिंदगीचा लेकराला हिशेब करणं कधी जमणारच नाही.

गेल्या सत्रात काही दिवस शाळा सुरू होत्या. एक दिवस दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक शाळेत आले. अंगावरचे कपडे बऱ्यापैकी फाटलेले आपल्या मुलाविषयी चौकशी केली. वर्गात असण्याबद्दल तपास केला, मुलगा वर्गात नव्हता. तपास करून निघून गेल्यावर मीदेखील त्या विद्यार्थ्याबाबतीत चौकशी केली वर्गशिक्षकाला त्याच्या नियमितपणाविषयी विचारणा केली, विद्यार्थी शाळेत येत असल्याबद्दल त्यांनी सांगितले. थोडा वेळ गेल्यावर ते पालक मुलाला घेऊन हजर झाले आणि शाळेतच मुलाला मारू लागले. मुलाला मारत असताना त्यांच्या डोळ्यांत आसवांच्या धारा वाहत होत्या.... आणि ते बोलत होते,‘सर मी हमाली करतो, दिवसाला दोन तीनशे रुपये मिळतात, गेल्याच आठवड्यात मालकाकडून उसने पैसे घेतले आणि याला सात हजारांचा मोबाइल घेऊन दिलाय ऑनलाइन शिक्षणासाठी. गुरुजी त्याच्या आईची तब्येत बरी नाही. मी हाताने स्वयंपाक करून ह्याले खायला देतो, मग कामाला जातो, ह्यो त्याच्या मित्रांबरोबर वीटभट्टीवर बसला होता. त्यांचं बोलणं ऐकताना त्यांच्या डोळ्यातल्या आसवांनी माझ्या डोळ्यांत केव्हा जागा केली, हे मलादेखील कळलं नाही.

बाप कसा असतो...याचे हे उदाहरण लेकराचा अन् कुटुंबासाठी अहोरात्र जागणारा तो पहारा असतो. त्याच्यातल्या माणुसपणाला लेकरांनी समजावून घेणं आत्यंतिक महत्त्वाचं असतं. गरीब, सामान्य की श्रीमंत कुटुंबातला बाप असो, मुला-मुलींसाठी त्याची हायउपस वेगळी नसते. लेकरांना लहानाचं मोठं करतानाच, त्याच्या चोचीत दाणे टाकण्याची त्याची चाललेली लगबग...धडपड दृष्टीआड करणाऱ्यांनी स्वतःला सवाल केला पाहिजे. काल-परवा ओळख झालेल्या एखाद्या उडाणटप्पू मुलाबरोबर प्रेमाच्या आणाभाका घेत त्याचा हात धरून पळून जाऊन विवाह करणारी मुलगी बापाच्या काळजाची, त्यानं बाप म्हणून केलेल्या कर्तव्याची जाणीव न ठेवता जो अल्पायुषी विचार करते, तो बापाला किती ठेच पोहोचवणारा असतो, याचं भान येणं महत्त्वाचं असतं. माझ्या वार्धक्य नावाच्या कवितेतल्या ओळी वास्तवता मांडतात,

चोचीत दाणे टाकताना पक्ष्यांची होणारी लगबग

याहीपेक्षा अधिक करीत असतो आमचा बाप उठबस

पंखात बळ आलं की, पक्ष्यांची पिल्लं उडायला लागतात

माणसात बळ आलं की, नाती तुटायला लागतात.

देशभरात वाढत जाणाऱ्या वृद्धाश्रमांची संख्या पाहता आपल्या साऱ्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. बाप नावाच्या काळजाला आपल्या काळीजकुपीत आनंद देण्याची खूप सारी क्षमता आहे. यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला मायबापाच्या उपकाराची नव्हे तर आपल्या आस्थेची, जिव्हाळ्याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. आपल्या साऱ्यांना वाढवणाऱ्या आणि मायेची ऊब देत आपल्या डोळ्यांतल्या आसवांना वाट करून न देता आसवांना थिजवणाऱ्या बापरूपी सावलीला हृदयापासून सलाम.

पहाटे उगवणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवून तर रात्रीचा घरातला लाईट बंद करेपर्यंत लेकरांची काळजी करणारा बाप आपल्या जीवनाला सर्वार्थाने जो आकार देत असतो तो किती महत्त्वाचा असतो हे बहुतेक वेळा आपण अनुभवत असतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लेकरांची भूक भागविण्यासाठी चुकीचा मार्ग पत्करत चोरी करणारा बापदेखील मुलगा शिक्षण घेऊन पुढेच जावा, अशी स्वप्न पाहत असतो. त्यानं चोरी करून उदरनिर्वाह करावा, असा चुकूनदेखील तो विचार मनात येऊ देत नाही आणि म्हणूनच त्याच्या अंतःकरणाला थोडी साद घातली की, बापाचा पसारा आपोआप तुमच्या हृदयाला कवटाळत असतो.

Web Title: A shadow called the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.