भुसावळात रेल्वेची दुचाकी व चारचाकी पार्किंग भरउन्हात शेडविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:49 PM2019-05-10T22:49:01+5:302019-05-10T22:49:45+5:30
रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शेडच नसल्याने भर उन्हात करावी लागत आहे. यामुळे, वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शेडच नसल्याने भर उन्हात करावी लागत आहे. यामुळे, वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचारी तसेच इतरांसाठी रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था केली आहे दक्षिणेकडील पार्किंगमध्ये एका रांगेत ८० दुचाकी, तर अशा १० ते १२ रांगा एकाच वेळेस लागतात. जवळपास एक हजारापेक्षा जास्त वाहने पार्क होतात. एका वाहनासाठी पाच तासांकरिता पाच रुपये, ५ ते १२ तासांकरिता १० रुपये व एका दिवसाकरीता १५ रुपये अशी दर आकारणी केली जाते. मासिक वाहन पार्किंगसाठी प्रति महिना २०० (रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी) व इतरांसाठी ४०० रुपये दुचाकी वाहनाची पार्किंग फी आकारली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांची वसुली होत असताना मात्र त्यामानाने सुविधा नाही.
तीव्र उन्हात दुचाकी शेडविना
हॉट सीटी भुसावळचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त असते. अशा उन्हात वाहने उन्हातच लावावी लागतात. यामुळे वाहनातील पेट्रोल उन्हामुळे उडते. वाहनांचे रंग पुसट होतात तर चाकांमधील हवाही कमी होते. एकूणच पैसे देऊनसुद्धा भर उन्हामध्ये वाहने उभी करायला करावी लागतात. यामुळे मक्तेदार व व दुचाकी वाहन लावणारे यांच्यात नेहमी खटके उडत असतात.
एक कोटीचा ठेका, सुविधा मात्र शून्य
दक्षिणेकडील रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी वाहनाचा ठेका जवळपास एक कोटीच्या घरात दिला गेला आहे. यात १८ टक्के जीएसटी अधिक दोन टक्के टीसीएसची रक्कम अतिरिक्त अदा करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाला उत्पन्न मिळत असून, मात्र सुविधा नाही. फक्त वाहने वाहने रांगेत उभे राहतात तेवढेच. वास्तविक पाहता उन्हाळ्यात, पावसाळ्यात वाहनांना शेड आवश्यक आहे तसेच वाहन पार्किंग करत असताना एखादं कुटुंब जर सोबत असल्यास त्यांची बैठक व्यवस्था तसेच स्वच्छतेसाठी शौचालयाची, पाण्याची व्यवस्था असणेही गरजेचे आहे. परंतु नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.
चार चाकी वाहनाचीही उघड्यावरच पार्किंग
लोहमार्ग पोलिसांच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या चार चाकी वाहनांची पार्किंग ही शेडविना उघड्यावरच केली जाते.
कार पार्किंगसाठी पाच तासासाठी १५ रुपये व एका दिवसासाठी ३५ रुपये आकारणी केली जाते. मात्र सुविधा त्याप्रमाणे मिळत नाही.
उत्तरेकडील पार्किंगही उघड्यावर
रेल्वेस्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोरील दुचाकी वाहनांची पार्किंग ही उघड्यावरच केली जाते. येथेही शेड नसल्यामुळे उन्हातच दुचाकी वाहने लावावी लागतात. येथे तर खाली फ्लोरिंगसुद्धा केलेली नाही. तसेच फूट ओव्हर ब्रिजवरून प्रवासी अनेक वेळा पार्किंगमध्ये थुंकतात. त्यामुळे वाहनावर अनेक वेळा घाण होत असते.
या पार्किंगमध्ये ८० वाहनांच्या जवळपास सहा ते आठ रांगा दररोज लागतात. कडक तापमानामुळे नुकताच रेल्वे मालगाडीचा डबा, चार चाकी वाहने पेटण्याच्या घटना घडल्या होत्या. अशातच पार्किंगमध्ये शेड नसल्यामुळे एखाद्या दुचाकी वाहनाने पेट घेतला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुचाकी पार्किंगमध्ये भरउन्हात दुचाकी पार करावे लागते. पार्किंगमधून काढल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत सावलीत गाडी उभी करावी लागते. त्यानंतर पुढील प्रवास होतो. फार त्रासदायक स्थिती आहे.
-विजया मोरे, लेक्चरर, तंत्रनिकेतन कॉलेज.
शेड नसल्यामुळे उन्हातच वाहने उभी करावी लागतात. यामुळे गाडीतील पेट्रोल उडते. गाडीचा रंग पुसट होतो. पर्याय नसल्याने नाईलाजाने उन्हातच दुचाकी लावावी लागते.
-गणेश काकडे, शिक्षक
शेड नसल्याने दुचाकी इतकी गरम होते की कपड्याच्या सहाय्याने गाडी पार्किंगमधून काढावी लागते. गाडी १५-२० मिनिटे सावलीत उभी करून नंतरच गाडीवर बसणे शक्य होते. शेड असणे अत्यंत आवश्यक आहे.
-शेख अखलाक शेक सरदार
पाण्याच्या व्यवस्थेचा व बसण्यासाठी पार्किंगमध्ये तरतूद नाही. शेडविषयी सूचना करण्यात येतील. लवकरच शेड उभारण्यात येईल.
-आर.के.शर्मा, वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक, भुसावळ विभाग