शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय शासनाने प्रकाशित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 04:12 PM2020-11-06T16:12:04+5:302020-11-06T16:13:56+5:30
शहीद भगतसिंह हे तरुणांचे आदर्श असून त्यांचे समग्र वाङ्मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केली आहे.
चाळीसगाव : शहीद भगतसिंह हे तरुणांचे आदर्श असून त्यांचे समग्र वाङ्मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे, अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केली आहे. मंगळवारी परिषदेने या मागणीचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना दिले.
जून २००६ मध्ये शहीद भगतसिंह समग्र वाङ्मयासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शहिद भगतसिंह जनशताब्दी समिती स्थापन करण्यात आली. त्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर,प्रा. डॉ. एन. डी. पाटील,अॅड. गोविंद पानसरे,डॉ.रावसाहेब कसबे,भाई वैद्य,प्रा. पुष्पा भावे,डॉ. भास्कर ल. भोळे, रा. प. नेने,आचार्य शांताराम गरुड,
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, असगरअली इंजिनिअर,डॉ. अशोक ढवळे, ज्योती म्हापसेकर,डॉ. रत्नाकर महाजन,आ. उल्हास पवार, अॅड. जयदेव गायकवाड हे मान्यवर सदस्य म्हणून होते. या समितीच्या माध्यमातून शहिद भगतसिंह समग्र वाङ्मय दत्ता देसाई यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. त्यात भगतसिंह यांच्या ८० दस्तऐवजांचा समावेश आहे. भगतसिंह यांची पत्रे, त्यांची तुरुंग डायरी, त्यांनी लिहिलेली पुस्तके अशी बरीच माहिती त्या ग्रंथात आहे. न्या.पी.बी.सावंत यांची दिर्घ प्रस्तावना या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. हे पुस्तक खाजगी प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित केले जात आहे. त्यामुळे हे प्रेरणादायी वाङ्मय शासनाने प्रकाशित केल्यास त्याची किंमत कमी होऊन सर्वसामान्यांना ते सहज उपलब्ध होईल. शासनाने मागणीचा विचार करावा. असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राज्य प्रवक्ते पंकज रणदिवे,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जिल्हा सचिव भूषण सूर्यवंशी, तुषार देसले, दीपक पाटील, राहुल राजपूत, नीलेश गायकवाड, विनोद शिंपी, पवन निकुंभ, पंकज पवार यांच्या सह्या आहेत.