शेंदुर्णीला महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:27 AM2019-03-06T00:27:04+5:302019-03-06T00:27:24+5:30
पदाधिकारी नसल्याने महिलांचा संताप
शेंदुर्णी, ता. जामनेर : येथील शनि मंदिर मागील खळवाडी या नवीन वसाहत परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतवर महिलांनी हंडा मोर्चा काढून पाण्याची मागणी केली. दुपारी १२ वाजेच्या नगरपंचायतवर मोर्चा आल्यानंतर तेथे कोणीही पदाधिकारी नसल्याने महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला.
येथील नदीकाठी असलेल्या शनि मंदिराच्या पाठीमागील नवीन वसाहतीस अनेक वर्षे झाली तरी या भागात पाणीपुरवठ्याची वाहिनीच पोहोचलेली नाही. या भागात अद्यापही हातपंपावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून हातपंप बंद असल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
वारंवार मागणी करूनही पाण्याचा प्रश्न सोडविला जात नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी थेट नगरपंचायवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्यासह सुशिलाबाई धनगर, कविताबाई धनगर, शांताबाई धनगर, रत्नाबाई धनगर, ज्योतीबाई धनगर, कौशल्याबाई धनगर, प्रमिला धनगर, अलका धनगर, शोभा धनगर, कोकिळा धनगर आदी महिला हंडा मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
आठ ते दहा महिन्यांपूर्वी पाण्यासाठी याच भागातील महिलांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन दिले होते, असे महिलांनी ‘लोकमत’ बोलताना सांगितले. मात्र त्यादृष्टीने कोणतेही पाऊल उचले गेले नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला.