राष्ट्रवादीची ताकद दाखविण्यासाठी शरद पवारांनी रणनिती बदलली!
By अमित महाबळ | Published: August 22, 2023 03:56 PM2023-08-22T15:56:47+5:302023-08-22T15:58:03+5:30
गवेगळ्या सभा घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी मोठी सभा घेऊन विरोधकांना योग्य तो संदेश देण्याचे काम खा. शरद पवार करणार आहेत.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ५ सप्टेंबरला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून, जळगाव शहरातील सागर पार्कवर त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या सभा घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी मोठी सभा घेऊन विरोधकांना योग्य तो संदेश देण्याचे काम खा. शरद पवार करणार आहेत.
पक्षांतर्गत बंडाळीनंतर खासदार शरद पवार यांची जिल्ह्यात पहिली सभा होत आहे. यापूर्वीही त्यांचा दौरा नियोजित होता. शिंदे गट आणि अजित पवार गटाचे लोकप्रतिनिधी असलेल्या पारोळा, अमळनेर व धरणगाव मतदारसंघात सभा होणार होत्या. चौथी सभा मुक्ताईनगरमध्ये होती. या ठिकाणी आमदार एकनाथ खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष आहे. पण पाऊस व अन्य कारणांमुळे त्यावेळी हा दौरा स्थगित झाला होता. आता दि. ५ सप्टेंबरची तारीख मिळाली आहे. मात्र, यावेळी रणनिती बदलत सभा एकाच ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यासाठी जळगाव शहरातील सागर पार्कची निवड करण्यात आली आहे.
...म्हणून वेगवेगळ्या सभा घेणे टाळले
वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या असत्या तर कोणाची सभा चांगली झाली याची तुलनात्मक चर्चा पक्षात सुरू झाली असती. सभांसाठी कार्यकर्त्यांची विभागणी झाली असती आणि ही चर्चा विरोधकांच्या पथ्यावर पडली असती. त्यामुळे पक्षाने जळगाव जिल्ह्यात रणनिती बदलली आणि एकच जंगी सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर चार ठिकाणच्या सभा सध्या तरी तहकूब केल्या गेल्या आहेत, अशी माहिती पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्याकडून मिळाली. परंतु, याला जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दुजोरा दिलेला नाही.
आजी-माजी लोकप्रतिनिधी करणार मार्गदर्शन
सभेच्या पूर्वतयारीसाठी पक्षाची बैठक बुधवारी (दि.२३) दुपारी १ वाजता पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. यावेळी आजी-माजी लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर व सतीश पाटील, प्रदेश चिटणीस इजाज मलिक उपस्थित असतील, असे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी म्हटले आहे. याशिवाय पक्षाचे नेते जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सभेसाठी संपर्क दौरा करत आहेत.