शरद पवारांचे महापौरांकडे ९ मिनिट अन् कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य!
By सुनील पाटील | Published: September 5, 2023 01:26 PM2023-09-05T13:26:42+5:302023-09-05T13:27:07+5:30
महाजन दाम्त्यांकडून शिवरायांची मूर्ती अन् चांदीचा गदा भेट!
जळगाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जाहिर सभेच्या निमित्ताने मंगळवारी जळगावात आले. विमानतळावरुन ते थेट मेहरुणमध्ये महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पवार ९ मिनिटे महाजन यांच्याकडे थांबले. या काळात त्यांनी कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवून बळ दिले. या ९ मिनिटात मेहरुणमध्ये चैतन्य आणि उल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते.
शरद पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड मुंबई येथून सोबत आले. पवारांच्या ताफ्यासोबतच असलेले जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड थेट मेहरुणमध्ये १०.५० वाजता दाखल झाले तर अजिंठा चौकात शरद पवार यांचे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी स्वागत केले. क्रेनच्या सहाय्याने पवारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तेथून १०.५५ वाजता पवार मेहरुणमध्ये दाखल झाले. जयश्री महाजन यांनी शरद पवार व एकनाथ खडसे यांचे औक्षण केले. त्याआधी जयंत पाटील व आव्हाड यांचे औक्षण झाले.
मंडपात दाखल झाल्यावर महापौर व त्यांचे पती सुनील महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व एक किलो चांदीची गदा देऊन पवार यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक बंटी जोशी, पाचोऱ्याच्या वैशाली सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर पवार अजिंठा विश्रामगृहाकडे रवाना झाले. पवारांच्या आगमनाच्यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.