वाळूचा लिलाव करण्यास तीव्र विरोध
By admin | Published: January 13, 2017 12:29 AM2017-01-13T00:29:19+5:302017-01-13T00:29:19+5:30
अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार : गोंडगाव आणि दलवाडेकारांचे प्रशासनाला निवेदन
भडगाव : तालुक्यातील दलवाडे शिवारातील गिरणा नदीच्या वाळू लिलावास तीव्र विरोध केला जात आहे. लिलाव करू नये. याबाबतचे निवेदन गोंडगाव, दलवाडे येथील ग्रामस्थांनी सह्यानिशी भडगाव निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे यांना दिले. प्रशासनाने वाळूचा लिलाव केल्यास न्यायालयात धाव घेऊ, असेही ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, गिरणा नदीतील गट नं.49 मध्ये गोंडगावची पाणीपुरवठा विहीर आहे. पश्चिमेस केटीवेअर बंधारा आहे. पूव्रेस कजगाव -पारोळा रस्त्यावरील गिरणा नदीवरी पूल आहे. तसेच सावदे गावाची पाणीपुरवठा विहीरही आहे. यावर्षी नदीला कोणताही पूर न आलेला नाही. अगोदरच दलवाडे शिवारात वाळू कमी आहे आणि त्यात जर वाळूचा लिलाव झाला व वाळू उपसा झाला तर गोंडगाव, सावदे, कजगाव पाणीपुरवठा विहिरीच्या पाणी पातळीवर परिणाम होईल. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. वाळू उपसा झाला तर केटीवेअरच्या भिंतीसह गिरणा नदीवरील पुलास धोका होण्याचा संभव आहे. यामुळे प्रसंगी जीवितहानीही होऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, राहुल पाटील, रवींद्र पाटील दलवाडे, गुलाब पाटील सावदे, विजय पाटील, सुभाष पाटील, रतीलाल पाटील, नेहरू पाटील, नगराज पाटील, रमेश पाटील, चंद्रसिंग पाटील, अविनाश मांडोळे आदी उपस्थित होते. निवेदनावर शालिग्राम पाटील, जीवन पाटील, योगेश पाटील, गोरख पाटील, सुरेश पवार, कैलास पाटील, गणेश पाटील आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती वरिष्ठ पातळीवरही पाठविल्या आहेत.