शेवरे बु।। येथे आदिवासी महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:19+5:302021-07-08T04:12:19+5:30
अडावद, ता. चोपडा : खर्डी शिवारात विनाकारण जंगलतोड का करतात? यापुढे जंगलात दिसला तर याद राखा, असा दम ...
अडावद, ता. चोपडा : खर्डी शिवारात विनाकारण जंगलतोड का करतात? यापुढे जंगलात दिसला तर याद राखा, असा दम देत आदिवासी महिलेसह दोन जणांना मारहाण करीत महिलेचा विनयभंग करणाऱ्या खर्डी येथील तिघांना अडावद पोलिसांनी अटक केली आहे. येथून जवळच असलेल्या शेवरे बु. (ता. चोपडा) येथे दि. ६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अडावद पोलीस स्टेशनला शेवरे बु. येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि. ६ रोजी ४ वाजेच्या सुमारास तिचे पती व अन्य दोघे घरात जेवण करत असताना, खर्डी (ता. चोपडा) येथील मुरलीधर गोकुळ पाटील, समाधान प्रताप पाटील व अनिल ऊर्फ व्हिडीओ बापू कोळी या तिघांनी तिचे पती बालसिंग पावरा यांना खर्डी शिवारात विनाकारण जंगलतोड का करतात, यापुढे जंगलात दिसलात तर याद राखा, असा दम देत मारहाण केली. त्यांना सोडविण्यास गेलेल्या गुलीबाईसही मारहाण करत मुरलीधर पाटील याने भांडणाचा फायदा घेत गुलीबाईचा विनयभंग केला.
या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी गुलीबाई, पती व अन्य दोघांसह संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास अडावद पोलीस स्टेशनला येत असताना खर्डी गावात मुख्य चौकात अडवून अनिल कोळी याने परत शिवीगाळ करून गुड्या कुमाऱ्या बारेला व सायमल मकरसिंग बारेला या दोघांना विळ्याने मारहाण करून जखमी केले.
याबाबत अडावद पोलीस स्टेशनला गुलीबाई हिच्या फिर्यादीवरून तिघांविरुध्द भादंवि कलम ३५४, ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी पोलीस स्टेशनला एकच गर्दी केली होती. घटनेची तीव्रता पाहता, पोलिसांनी तात्काळ संशयित तिघांना गजाआड केले.
या घटनेत परस्परविरोधी दुसऱ्या फिर्यादीत खर्डी, ता. चोपडा येथील महिलेच्या तक्रारीवरून तीनजणांविरुध्द अडावद पोलीस स्टेशनला दि. ७ रोजी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास खर्डी शिवारात प्रताप घनदास बारेलासह दोनजणांनी शिवीगाळ करून डोक्यावर व पाठीवर चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व मण्यांची पोत तोडून नुकसान केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतळ, सहायक फौजदार जगदीश कोळंबे, शरिफ तडवी, योगेश गोसावी, नसिर तडवी हे करत आहेत.
पोलिसांनी तात्काळ घेतली दखल
या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतळ हे आपल्या ताफ्यासह खर्डी येथे तात्काळ दाखल झाले. वादाच्या परिस्थितीमुळे जमलेल्या जमावाला आवाहन करून दांडगेे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो आदिवासी बांधवांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशा संवेदनशील परिस्थितीत अडावद पोलिसांनी तात्काळ घेतलेल्या ‘ॲक्शन’मुळे मोठा अनर्थ टळला.