पारोळा नगरपालिका सभेत चार विषयांना शविआचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:39+5:302020-12-05T04:26:39+5:30
पारोळा : न.पा. ऑनलाइन सभेत ६६ विषयांवर चर्चा; दोन्ही गट पुन्हा आमने-सामने पारोळा : नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन ...
पारोळा : न.पा. ऑनलाइन सभेत ६६ विषयांवर चर्चा; दोन्ही गट पुन्हा आमने-सामने
पारोळा : नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन सभेत ६६ विषयांवर चर्चा करण्यात आली. यातील
चार विषयांना शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी हरकत घेत विरोध नोंदविला, तर
कोणत्याच विषयांच्या ठरावावर आमच्या गटाच्या नगरसेवकांना सूचक व अनुमोदनासाठी नावे घेऊ नये,
असे लेखी कळविले आहे. यातच नगराध्यक्षांनी शविआवर पुन्हा आरोप केला आहे.
नगराध्यक्ष करण पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता नगरपालिकेची ऑनलाइन जनरल
सभा घेण्यात आली. पटलावर एकूण ६६ विषय होते. यात शहरातील अनेक रस्ते, भुयारी गटारीसह छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सीसीटीव्ही बसवणे , माजी सैनिकांना करात सूट देणे यासह अनेक विषयांचा समावेश होता.
यावेळी शहर विकास आघाडीच्या गटनेत्या वंदना शिरोळे, नगरसेवक अशोक चौधरी, रोहन मोरे, महेश चौधरी यांनी चार विषयांना हरकती घेत लेखी विरोध नोंदविला. यात क्रीडा संकुलसमोरील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या विषयात ही जागा महामार्ग अंतर्गत येत आहे. तसेच क्रीडा संकुलाच्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी मुदतवाढीचा विषय ठेवण्यात आला. यावेळी या कामास जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिली आहे. फेरप्रस्तावास जोपर्यंत मंजुरी मिळत नाही. तोवर हे काम सुरू करू नये तसेच मुदतवाढ देऊ नये, असे शविआचे म्हणणे होते.
याशिवाय पथदिवे ,पोल दुरुस्ती या विषयावर हरकत घेत नियमानुसार काम करावे असे लेखी मत शविआच्या नगरसेवकांनी मांडले. सिमेंट रस्ता दुभाजक कामास मुदतवाढ देऊ नये, असे मत मांडले. या कामाची चौकशी करण्याबाबत लेखी मत मांडले.
बैठकीला उपनगराध्यक्ष जयश्री बडगुजर, महिला व बाल कल्याण सभापती अंजली पाटील, बांधकाम समिती सभापती मनीष पाटील, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, पाणीपुरवठा सभापती प्रकाश महाजन, नगरसेवक कैलास चौधरी, मंगेश तांबे, नगरसेविका वर्षा पाटील, रेखा चौधरी, छाया दिलीप पाटील, वैशाली पाटील, नवल
चौधरी, सुनीता प्रकाश वाणी, रेखा चौधरी, छाया दिलीप पाटील, प्रभारी मुख्याधिकारी विकास नवले सहभागी होते. विषयवाचन सुभाष थोरात यांनी केले.
---कोट----
एका बाजूला विकासकामांना विरोध नाही, असे जनतेला भासवायचे आणि दुसऱ्या बाजूला शहराच्या विकास कामात अडथळा निर्माण करावयाचा यातून जनतेची दिशाभूल करत शहर विकास आघाडीचे नेते विकासात खोडा आणत आहे.
- करण बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष, पारोळा
---
नियमाप्रमाणे विरोध आहे
मुदतवाढ देण्यात आलेल्या विषयांना शविआ गटाच्या नगरसेवकांनी लेखी विरोध नोंदविला आहे. आम्ही ज्या कामांची तक्रारी केल्या आहेत त्याच कामांना मुदतवाढीसाठी संमती देणे योग्य नाही. ६२ विषयांना आमच्या शविआ गटाच्या नगरसेवकांनी संमती दिली आहे.
- गोविंद शिरोळे, प्रमुख शहर विकास आघाडी, पारोळा