दापोरा येथील ‘ती’ वाळू ६५२ ब्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:50+5:302021-07-01T04:12:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दापोरा येथे दोन हजार ब्रास अवैध वाळू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दापोरा येथे दोन हजार ब्रास अवैध वाळू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली. त्यानंतर, तहसीलदारांनी या जागेवर जाऊन पाहणी केली होती. तसेच नंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांना दिला आहे. ही वाळू एकूण ६५२ ब्रास आहे. तसेच ही वाळू मातीमिश्रित असल्याचा अहवालही प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली. तसेच याबाबत जिल्हा खनिकर्म विभागाला पत्र दिले आहे. त्यांच्याकडून निर्देश प्राप्त झाल्यावरच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दापोरा येथे गिरणा नदीपात्रात दापोरा-लमांजन पुलाचे काम सुरू आहे. हे काम घेणाऱ्या ठेकेदार संस्थेने या पुलाचा पाया खोदताना निघालेले गौण खनिज नदीपात्राला लागून असलेल्या भागात ठेवले. मात्र, नियमानुसार १०० मीटरच्या आत गौण खनिज ठेवले पाहिजे. तसेच उत्खनन करताना त्याची परवानगी घ्यायला हवी, हे नियम ठेकेदाराने पाळले नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली होती.
कोट- लमांजन पुलाजवळ असलेली वाळू ही मातीमिश्रित होती. तसेच ६५२ ब्रास वाळू मिळाली आहे. त्याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडून निर्देश प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल. - नामदेव पाटील, तहसीलदार