‘त्या’ विवाहितेची झाली वैद्यकिय तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:19 AM2021-02-27T04:19:08+5:302021-02-27T04:19:08+5:30
जळगाव : प्राध्यापक असल्याचे खोटे सांगून पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याच्या प्रकरणात शुक्रवारी पीडित पत्नीची शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व ...
जळगाव : प्राध्यापक असल्याचे खोटे सांगून पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याच्या प्रकरणात शुक्रवारी पीडित पत्नीची शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पियुष हरिदास बावस्कर या तोतया प्राध्यापकासह त्याचे वडील हरिदास खंडू बावस्कर, सासु वासंती बावस्कर व चुलत सासरे शंकर खंडू बावस्कर (सर्व रा.संभाजी कॉलनी, औरंगाबाद) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेच्या चेअरमनकडून दिशाभूल
दरम्यान, पीडित मुलीचे लग्न जमविण्याआधी तिच्या वडिलांनी पियुष खरच कायमस्वरुपी नोकरीला आहे का? याची चौकशी करण्यासाठी संस्थेच्या चेअरमनशी भेट घेतली असता, त्यांनी कायमस्वरुपी नोकरीला असल्याचे सांगितले होते. लग्नानंतर मुलगी, तिचा पती व कुटुंब चेअरमनकडे जेवणाला गेले असता तेथे त्यांच्या बोलण्यातच जाणवले की पियुष कायम नोकरीला नाही व त्याला साडे सहा लाखाचे पॅकेज पण नाही. लग्नाआधी चेअरमननेही दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, लग्न जमविण्यासाठी पियुष माझ्या संस्थेत नोकरीला असल्याचे खोटे सांगणाऱ्या चेअरमनलाही या गुन्ह्यात आरोपी केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
साखरपुड्याचे फोटो आढळले
दरम्यान, पीडितेने पियुष याच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्याच्या जन्मतारखेत घोळ दिसून आला त्याशिवाय आधी एका मुलीसोबत झालेल्या साखरपुड्याचे फोटोही दिसून आले. पियुष याने लग्नाआधी बँकेतून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते, ते कर्ज फेडण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावे म्हणून देखील तिला मारहाण करण्यात येत होती,असे फिर्यादीत नमूद आहे.