वय होते अवघे साडेनऊ वर्षे, गाठली होती अयोध्या...! सर्वात कमी वयाची कारसेविका म्हणून नोंद
By अमित महाबळ | Published: January 21, 2024 07:58 PM2024-01-21T19:58:12+5:302024-01-21T19:58:28+5:30
६ डिसेंबरच्या कारसेवेनंतर सायंकाळी अयोध्यावासियांनी दीपोत्सव केला.
अमित महाबळ/ जळगाव : ते दिवसच वेगळे होते. ‘रामलल्लांना स्वत:चे स्थान मिळाले पाहिजे’, असे स्वप्न असायचे. त्यासाठी १९९२ च्या डिसेंबरमध्ये झालेल्या कारसेवेसाठी जळगावातून अनेकजण अयोध्येला गेले होते. त्यांच्यात सर्वात कमी वयाची कारसेविका म्हणून गीतांजली ठाकरे यांची नोंद आहे. त्यांचे वय साडेनऊ वर्षे होते.
गीतांजली ठाकरे यांनी सांगितले, की त्यांच्यासोबत वडील प्रल्हाद व आई मीराबाई, दीपक व ज्योती घाणेकर, भाईजी मुंदडा, गोविंद व बसंती सोनी होते. वाराणसीपासून पुढच्या प्रवासासाठी गाड्या बदलल्या. फैजाबादला जाताना आमच्या बसला रस्त्यात आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दुसरी बस मिळून फैजाबादला पोहोचायला ५ रोजी, सायंकाळचे ७ वाजले होते. शरयूच्या किनारी मंडप उभारून त्यात कारसेवकांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबरला कारसेवेसाठी जायचे होते.
तो दिवस उजाडला...
तो दिवस उजाडला. लालकृष्ण आडवाणींचे भाषण सुरू होते. मुरली मनोहर जोशी हे शांततेचे आवाहन कारसेवकांना करत होते. अचानक कारसेवकांनी त्या ठिकाणाकडे धाव घेतली आणि काही मिनिटांतच आडवाणींचे शब्द ऐकू आले, ‘आपले काम कारसेवकांनीच केले’. त्यानंतर पळापळ सुरू झाली. आई आणि माझी ताटातूट झाली. वडील एका कारसेवकाला घेऊन तात्पुरत्या उभारलेल्या दवाखान्यात गेले होते. मी भांबावले, आजूबाजूला गर्दीत ओळखीचे कोणीच दिसत नव्हते, २ किमी चालत गेल्यावर जळगावचे मुकुंद मेटकर भेटले. त्यांनी मला खांद्यावर बसवून त्यांचा मंडप गाठला. तेथून आमच्या मंडपात आलो. या ठिकाणी आईची भेट झाली. तोपर्यंत मी हरवले आहे याची माहिती वडिलांनी नव्हती. सुखरूप असल्याचे पाहून आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ती वीट आमच्याकडेही होती...
६ डिसेंबरच्या कारसेवेनंतर सायंकाळी अयोध्यावासियांनी दीपोत्सव केला. कारसेवकांसाठी दुकानांची दारे खुली केली. कारसेवेच्या ठिकाणी प्रभू श्रीराम लिहिलेल्या अनेक विटा आढळून आल्या होत्या. त्यातील एक आम्हीही सोबत घेतली. जळगाव-अयोध्या प्रवासाला दीड दिवस लागला परत येताना वाटेत ठिकठिकाणी थांबावे लागले. गाड्या बदलाव्या लागल्या. पोलिस अटक करण्याची शक्यता असल्याने सोबत घेतलेली वीट रस्त्यातील एका हनुमान मंदिरात ठेवावी लागल्याचे गीतांजली ठाकरे यांनी सांगितले.
घरावर तुळशीपत्र ठेवले...
रेल्वे प्रवासात ज्योती घाणेकर यांनी तुम्ही संपूर्ण कुटूंब का येत आहात, असे विचारले. त्यावर वडिलांनी घरावर तुळशीपत्र ठेवून चाललो आहोत, असे आईला सांगितले होते. मला त्यावेळी त्याचा अर्थ कळला नव्हता. मी आईला म्हटलं, माफ कर पण बाबा म्हटले तशी तुळशीची पानं तोडून घराच्या छतावर ठेवायला विसरले आहे. माझे हे बोलणे ऐकून त्यावेळी आईने कवेत घेतले होते, असेही गीतांजली ठाकरे यांनी सांगितले.