दफनभूमीच्या जागेवरील शेड, झोपड्या मनपाने तोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:35+5:302021-02-06T04:27:35+5:30
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून गुरुवारी जोरदार कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. नेरी नाका स्मशानभूमीच्या मागील बाजुस असलेल्या ...
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून गुरुवारी जोरदार कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. नेरी नाका स्मशानभूमीच्या मागील बाजुस असलेल्या दफनभूमीच्या जागेवर काही शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे उभारलेले शेड व मजुरांच्या काही झोपड्या मनपाकडून तोडण्यात आल्या. तसेच विठोबा व योगेश्वर नगरातील पक्क्या बांधकामावर देखील जेसीबी चालविण्यात आला. दफनभूमी भागातील अतिक्रमण काढताना मजुरांनी विरोध केल्याने, काही काळ तणाव देखील निर्माण झाला. दरम्यान, मनपाने उर्वरित अतिक्रमण काढून घेण्यासाठी मजुर व शेतकऱ्यांना एका दिवसाची मुदत दिली आहे.
शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. आता ही अतिक्रमणे मनपाच्या रडारवर असून, दररोज विविध भागात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी योगेश्वर नगर, विठोबा नगर, नेरी नाका स्मशानभूमी परिसरात कारवाई करण्यात आली. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काही ठिकाणी वाद देखील झाले.
झोपड्या न तोडण्यासाठी दिले ५० हजार
मनपाच्या पथकाकडून कारवाईला सुरुवात होताच या भागातील अतिक्रमणधारकांनी कारवाईचा विरोध केला. तसेच आम्ही कारवाई होवू नये म्हणून ५० हजार रुपये अरुण मोरे नामक व्यक्तीला दिले असल्याचा दावा यावेळी या भागातील महिलांनी केला. त्यामुळे कारवाई न करण्याची मागणी केली. यावेळी मोठा जमाव याठिकाणी जमा झाला होता. तसेच कारवाई झाल्यास आम्ही रहायचे कोठे? असा ही प्रश्न महिलांनी उपस्थित केला. मनपाच्या पथकाने सुरुवातीला दोन झोपड्या व शेड जेसीबीच्या सहाय्याने तोडले. मात्र, वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता, मनपाने या भागातील रहिवाश्यांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली.
शेतकऱ्यांनी तयार केले गोठे अन् शेड
सुमारे दीड एकर जागा असून, अनेक वर्षांपासून ही जागा पडून आहे. जुन्या जळगाव भागातील अनेक शेतकऱ्यांनी याठिकाणी पत्र्याचे शेड तयार करून, याचा वापर गोठ्यांसाठी केला जात आहे. आपला माल व चारा याठिकाणी ठेवला जात असून, शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठीही झोपड्या तयार केल्याचे याठिकाणी आढळून आले. ही जागा मनपा मालकीची असून, मनपा प्रशासनाने ही जागा खाली करण्याचा सूचना मजुरांना दिल्या आहेत.
दहा फुट वाढलेले पक्के बांधकामही तोडले
कालंका माता चौफुली परिसरातील योगेश्वर नगरातील मुख्य रस्त्यालगत संगीता पाटील यांनी सुमारे १० फुटाचे अतिक्रमण करुन, दुकान तयार केले होते. तसेच दुसऱ्या गल्लीतून येणारी लहान बोडीत देखील बांधकाम करून, हा रस्ताच बंद केला होता. याबाबत छाया वाणी यांनी लोकशाही दिनात मनपा प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत, मनपाच्या पथकाने सर्व पक्के बांधकाम जेसीबीव्दारे तोडण्यात आले. यासह विठोबा नगरातील चार अतिक्रमणांवर देखील कारवाई करण्यात आली. यापैकी तीन अतिक्रमणधारकांनी स्वतहून बांधकाम तोडून घेतले. तर एक अतिक्रमण मनपाच्या पथकाकडून तोडण्यात आले.