‘वर्ड पॉवर चॅम्पियनशिप’मध्ये शेकोकर बहिणींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:49+5:302021-07-01T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुंबईच्या लीप फॉरवर्ड संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाची राज्यस्तरीय वर्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धेचा निकाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुंबईच्या लीप फॉरवर्ड संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाची राज्यस्तरीय वर्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील जिजामाता विद्यालयातील खुशी शेकोकर व तेजस्विनी शेकोकर या बहिणींनी बाजी मारली आहे.
मुंबईतील लीप फॉरवर्ड संस्थेतर्फे दोन महिन्यांपूर्वी इंग्रजी विषयाची राज्यस्तरीय वर्ड पॉवर चॅम्पियनशिप ही स्पर्धा घेण्यात आली. यात महाराष्ट्रभरातून १० हजार ७५७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेऊन त्यातील ६० विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनी खुशी शेकोकर व तेजस्विनी शेकोकर या दोन्ही बहिणींचा समावेश होता.
खुशीने द्वितीय तर तेजस्विनीने पटकाविला तृतीय क्रमांक
स्पर्धेची अंतिम फेरी ही झूमॲपद्वारे पार पडली. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यभरातील ६० विद्यार्थ्यांमधून जिजामाता विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी खुशी शेकोकर हिने द्वितीय तर इयत्ता नववीची विद्यार्थिनी तेजस्विनी शेकोकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थिनींचा बुधवारी प्रमाणपत्र व संपूर्ण शालेय साहित्य, वह्या व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब डी. एल. महाले, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी सत्कार केला. विद्यार्थिनींना आशा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.