फैजपुरातील शेंदूर अर्चित गणेश मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 02:44 PM2020-08-23T14:44:05+5:302020-08-23T14:45:32+5:30
फैजपूर येथील धाडी नदी पात्रालगत असलेले श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व त्यांनीच जीर्णोद्धार केलेले फैजपूर येथील धाडी नदी पात्रालगत असलेले श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ५०० वर्षे जुने मंदिर आहे.
नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या गणपती वाडी देवस्थानातील 'श्रीं ची मूर्ती ही शेंदूरअर्चित एकमेव अशी विलोभनीय आहे. वरदविनायक सिद्धी दाता म्हणून भाविकांची या देवस्थानावर श्रद्धा आहे. या देवस्थानात संकष्टी चतुर्थी, गणेश चतुर्थीपासून १० दिवस भाविकांची गर्दी असत.े एरवीसुद्धा भाविकांची वर्दळ या देवस्थानात सुरू असते.
गणपती वाडी देवस्थानचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे साक्षात पांडुरंगाने येऊन ज्यांच्या कर्जाची परतफेड केली, असे निस्सीम भक्त संत श्री खुशाल महाराज यांची संजीवनी समाधी, उत्तराभिमुख एकमेव असे हनुमान मंदिर, शनीमंदिर, दत्तमंदिर, महादेव मंदिर व एकमेव संतोषी माता मंदिर या एकाच परिसरात आहे.
श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थानाला शासनातर्फे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केल्याने तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्तनिवास, सिमेंट रस्ते, पथदिवे, शौचालय, अशी विकास कामे तसेच लहान मुलांसाठी खेळणी न.पा. प्रशासनातर्फे लावण्यात आली आहेत. गणपती वाडी विकासासाठी न.पा. प्रशासन सतत सहकार्य करीत असते. मंदिराचे व्यवस्थापन उमेश गुजराथी यांच्याकडे असून, त्यांना तुषार चौधरी, छगन नाथजोगी, वैभव नाथजोगी, लीलाधर नेहेते, दीपक राजपूत यांचे सहकार्य लाभत असते.