अनुभवांची शिदोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:22+5:302021-06-16T04:22:22+5:30
लेखक : अशोक कौतिक कोळी, जामनेर २० जून हा जागतिक फादर्स डे ! जागतिक असल्यामुळे फादर्स डे नाही, तर ...
लेखक : अशोक कौतिक कोळी, जामनेर
२० जून हा जागतिक फादर्स डे ! जागतिक असल्यामुळे फादर्स डे नाही, तर आपला पितृ दिवस...
काही असो, यानिमित्ताने बापाचे महत्त्व तर अधोरेखित होणार आहे... नाही तरी बाप म्हणजे वेगळा धाक असतो... आणि या धाकामागे प्रेम असतं.
आजकाल सगळे आपापल्या कामात मश्गुल. कधी विचारतो का आपण बापाला, बाबा तुम्हाला काय हवं ? का असे बसलात ? अनेकवेळा बाप एकटा एकटा बसलेला असतो. एकटक बघत असतो. कसल्यातरी विचारात गढलेला असतो. बाप असा नेहमीच चिंताग्रस्त असतो. त्याला काळजी असते आपल्या कुटुंबाची. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची. प्रत्येकाला काय हवं, काय नको, याचाच विचार सतत त्याला सतावत असतो. विचारांच्या या काळजीनेच बाप एकटा एकटा पडत जातो. वार्धक्याकडे झुकत जातो. आपल्या लक्षातही येत नाही.
बापाच्या अशा अवस्थेचा किंवा परिस्थितीचा कधी आपण विचार करतो का ? कधी विचार केला आहे का ? आपण आपल्या बापाचा ? वास्तविक बाप हा सगळ्यांचा आधारस्तंभ असतो. बहुतेक ठिकाणी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी त्याच्यावर असते. काय असते कुटुंब प्रमुखाची जबाबदारी, कधी अनुभवलीय का आपण ? तर नाही ! आपण फक्त आपल्या दुनियेत मश्गुल. आम्हाला जे काही हवं, नको, ते तुम्ही आम्हाला नीटगुमान आणून द्या. तेवढं मिळालं म्हणजे खूश ! बाकी दुसरा विचार काही नाही.
कदाचित खऱ्याही असतील तुमच्या गरजा; पण त्या पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा आणि इतर गोष्टी यांची जुळवाजुळव करताना बापाची काय हालत होते, याची जाणीव असते का आपल्याला. याचे उत्तर अर्थातच नाही असते. आपल्याला नेहमी दिसत असतो, कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करणारा बाप. घरातील प्रत्येकाला काय हवं, नको, ते तो सगळं बघत असतो. आपल्या ताटातील जेवण असो की अंगावरील कपडेलत्ते, मौजमजेच्या सगळ्या वस्तू बापाच्या श्रमातून आलेल्या असतात, याची कल्पना असते का आपल्याला ? बापही बिचारा गपगुमान राबत असतो. कधी कोणाजवळ तक्रार करत नसतो. बापाला रडताना आपण कधी पाहिलेलं नसतं. हसतानाही तो कधी दिसत नाही.
जगण्याच्या धबडग्यात बिचारा स्वतःलाच विसरून गेलेला असतो. मुलांना नवे कपडे घेऊन देणाऱ्या बापाच्या अंगात नेहमी फाटलेली कपडे असतात. दुसऱ्याचे अश्रू पुसता-पुसता त्याच्या डोळ्यांतील अश्रू केव्हाच आटून गेलेले असतात. आणि बाप हा केवळ उरतो कुटुंबापुरता. नेहमी दुसऱ्यासाठी राबणारा. दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारा...
या सगळ्या धबडग्यात बापाचा कधी बापड्या होतो हे कळतही नाही. कुणीही त्याला आपली कामं सांगतात. हे आणा... ते आणा... घरात वस्तू आणून देणारा... कुटुंबातील गरजा पुरवणारा... सतत राबत असणारा... हा बाप एखादा घरगडी होऊन जातो... कधीकाळी मालक असलेला बाप गडी होऊन जातो... मुले मोठी होऊन जातात... त्यांच्या संसारात रमतात... पण आयुष्यभर झिझणाऱ्या, झटणाऱ्या बापाकडे बघायला कुणालाही वेळ मिळत नाही... कधीकाळी रूबाबात असणारा बाप राबून राबून पुरता खंगून जातो... असह्य, हतबल होतो... या बाबीचा निश्चितच विचार व्हायला हवा. 'मातृ -पितृ देवो भव' अशी मानणारी आपली संस्कृती आहे. याची जाण आपण ठेवायलाच हवी. विशेषकरून तरुण वर्गाला हे सांगणे आहे. तुमच्या पंखात उडण्याचे बळ भरणारा हा बापच असतो. आई मायेची पांघरण घालत असते, पण बाप चोचीत दाणा भरवत असतो. अशा बापाची अवहेलना कदापि होता कामा नये. जरूर तुम्ही आईचे गुणगाण गा... पण बापाच्या श्रमांनाही विसरू नका.
कधीकाळी त्याच्याच अंगाखांद्यावर तुम्ही खेळलेले असता. त्याच्याच अंगाखांद्यावर खेळून तुम्ही मोठे झालेले असता. त्याच्याच हातांनी कुटुंबाचा तंबू पेलून धरलेला असतो. त्याखालीच तुमचे भरणपोषण, वाढ झालेली असते. आज भलेही तो थकला असेल, शरीर साथ देत नसेल; पण तुम्हाला जगण्याची उभारी देणारी अनुभवांची शिदोरी त्याच्याजवळच आहे हे विसरू नका. आज जागतिक फादर्स डे आहे म्हणून फक्त त्याचे कौतुक करून थांबू नका, तर जीवनभर बापाच्या ऋणात राहा. अशाने तुमचे कल्याणच होणार आहे, हे विसरू नका !
-