जळगावातील शिवकॉलनी थांब्यावरील साईडपट्या उठल्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:24 PM2018-07-09T12:24:37+5:302018-07-09T12:25:17+5:30
दररोज लहान-मोठे अपघात
जळगाव : महामार्गावर दररोज लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरू असलेल्या शिवकॉलनी थांब्यावरील साईडपट्ट्या नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत. अत्यंत वर्दळीच्या महामार्गावरील हा थांबा असला तरी तेथील साईडपट्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील नागरिक संतापदेखील व्यक्त करीत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शहरातील महत्त्वाचा थांबा असलेल्या शिवकॉलनी थांब्याजवळ अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारीदेखील भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीस धडक देत घरी जात असलेल्या सुरेखा सुभाष सनेर (वय ४३, रा. श्रीसमर्थ नगर, खोटे नगर) या महिलेला चिरडल्याची घटना दुपारी शिवकॉलनी थांब्यानजीक घडली होती. या अपघातात या महिलेचा जीव जावून भाऊ विकास भटू सोनवणे हे जखमी झाले. अशा नित्याच्या अपघातामुळे या थांब्यानजीकच्या साईडपट्ट्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘लोकमत’ने या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता या ठिकाणी आजूबाजूने येणाऱ्या रस्त्यावरून महामार्गावर लागताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे व त्यात अनेकांचे तोल कसे जातात हेदेखील दिसून आले.
चार रस्त्यावरून चढताना कसरत
शिवकॉलनी थांब्याजवळ धुळ््याकडे जाताना डाव्या बाजूला दोन तर उजव्या बाजूला दोन रस्ते महामार्गाला लागतात. यामध्ये डाव्याबाजूला १०० फुटी रस्त्याकडे व शिवकॉलनीत रस्ता जातो तर उजव्या बाजूला गणेश कॉलनी व गणेश कॉलनी थांब्याकडे रस्ता जातो. या चारही रस्त्यावरून महामार्गावर दुचाकी असो की रिक्षा किंवा इतर कोणतेही वाहने महामार्गावर लागताना त्यांना कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. या रस्त्यांवरून महामार्गावर लागताना चढ असल्याने वाहनधारक वेगाने येतात व ऐन डांबरी महामार्गाच्या साईडपट्ट्या खराब असल्याने त्यावरून दुचाकी घसरल्या जातात तसेच त्यांचे तोल जाऊन ते खालीदेखील पडतात. आजही एक दोन जणांचा अशाच प्रकारे येथे तोल गेला मात्र त्यांनी पाय खाली टेकवत वाहनावर नियंत्रण मिळविले.
गतिरोधकांची दुरवस्था
ऐन थांब्याजवळच गतिरोधकाचीही दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या बाजूला डांबर वर येऊन उंच वटा तयार झाल्याने व गतिरोधकही ओबड-धोबड असल्याने अपघातास निमंत्रण मिळते. त्यामुळेही येथे अपघात वाढत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले.
अभियांत्रिकी ते शिवकॉलनी दरम्यान कसरती
शिवकॉलनी थांब्याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ते शिवकॉलनी थांब्यापर्यंत महामार्गावर येणारे आठ रस्ते आहे. या ठिकाणाहून येतानावाहनेवेगानेयेतात व त्यात घात होऊन त्यांच्या जीवावर बेतते. त्यासाठी साईड पट्यांचे काम करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर बस थांबल्याने अडचणी
धुळ््याकडून जळगावकडे येणाºया बसेस शिवकॉलनी थांब्यावर थांबल्यानंतर बसच्या पुढून अथवा मागून बाजूने येणाºया या रस्त्यांवरून दुचाकीस्वार महामार्गावर येत असल्यास त्याला महामार्गावरील वाहन दिसत नाही व ऐन रस्त्यावर लागताना ते दिसल्यास ब्रेक दाबताच साईडपट्ट्यांवरून वाहने घसरतात. त्यामुळे बस थांब्याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.
माजी उपप्राचार्यांचा घेतला होता बळी
खराब साईड पट्ट्यांमुळे शिवकॉलनीनजीक दोन वर्षापूर्वी मू.जे. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. व्ही.जे. चौधरी यांचा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागला होता. अशाच प्रकारे लहान मोठ्या अपघातात कोणी जखमी होते तर कोणाच्या जीवावर बेतणे नेहमीचे झाले आहे.
समांतर रस्ते होणे गरजेचे
साईडपट्या खराब झाल्या असल्या तरी समांतर रस्ते होत नसल्याने या भागातील रहिवाशी संताप व्यक्त करीत आहे. समांतर रस्त्यांसाठी आंदोलनेदेखील झाले, मात्र त्याची अद्यापही दखल घेतली जात नसल्याने समांतर रस्त्यासाठी अजून कोणाचे बळी जाण्याची वाट पाहिली जात आहे का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवकॉलनी थांब्यानजीकच रस्त्याच्या साईडपट्या खराब झाल्याने अपघात होत आहे. त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
- रमेश पाटील, रहिवाशी, शिवकॉलनी
महामार्गावर लागताना चारही रस्त्याने वाहने वेगाने येतात. मात्र साईडपट्या खराब असल्याने वाहने घसरतात. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- सुभाष काळे, रहिवाशी, शिवकॉलनी
आम्ही गणेश कॉलनी भागातून शिवकॉलनीकडे आलो तर रस्त्यावर लागताना मोठी कसरत करावी लागते. यातून अपघात होतात.
- राजेंद्र शिंदे, रहिवाशी, गणेश कॉलनी
१०० फुटी रस्त्याकडून येताना महामार्गावर लागायचे झाल्यास येथे मोठी वर्दळ असते. त्यात रस्त्याच्या कडेला तोल जाण्याची भीती असते.
- योगेश जाधव, रहिवाशी, शिवकॉलनी.