शिंदे, फडणवीस यांना प्रचारासाठी वेळ मिळतो, शेतकऱ्यांसाठी नाही; एकनाथ खडसेंची टीका
By सुनील पाटील | Published: May 6, 2023 07:50 PM2023-05-06T19:50:36+5:302023-05-06T19:50:47+5:30
केळी, पपई, कांदा यासारखी पिके नामशेष झाली. पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत, असा आरोपही खडसेंनी केला.
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्नाटकमध्ये प्रचाराला जायला वेळ आहे, पण अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी बैठका घ्यायला, मदत करायला वेळ नसल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
गेल्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात, प्रामुख्याने खानदेशात अवकाळी पाऊस, वादळ वारा आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी, पपई, कांदा यासारखी पिके नामशेष झाली. पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत, असा आरोपही खडसेंनी केला. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. नुकसानग्रस्तांना मदत करु, असे सरकारकडून सांगितले जात आहे, मात्र अजून तरी शेतकऱ्यांना एक रुपयाची देखील मदत झालेली नाही. शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनाम दिल्याच्या प्रकरणात खडसे म्हणाले, या निर्णयामुळे पवारांना मानणाऱ्या वर्गामध्ये अस्वस्थता होती. पवारांच्या निर्णयानंतर पुढे काय हा प्रश्न होता पक्षात विविध चर्चा होती, अलीकडच्या महिना दोन महिन्याच्या काळात विविध घटना घडल्या होत्या. अशा परिस्थितीत शरद पवारांचा निर्णय धक्कादायक होता, असे ते म्हणाले.
बारसू कुणाची खासगी मालमत्ता नाही
बारसू रिफायनरीबद्दल मत भिन्नता असू शकते, परंतु बारसु ही कुणाची मालमत्ता नाही, त्यामुळे तिथं जायला कुणीच मज्जाव घालू शकत नाही. भाजपने आव्हान दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे दौरा केला. उद्धव ठाकरेंनी बारसु दौरा केल्याने त्याची सहानुभूती शिवसेनेला मिळेल या भीतीनेच भाजपने मोर्चाची घोषणा केली. प्रकल्प ग्रस्तांची सहानुभूती मिळविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. भाजप या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही खडसे यांनी केली.
कर्नाटकमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळेल असं वाटत नाही. सर्व्हेचे जे रिपोर्ट येत आहेत, त्यात भारतीय जनता पार्टी पूर्वीपेक्षाही मागे जात असल्याचे चित्र आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये यश मिळायला पाहिजे, म्हणून भाजपाकडून वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत. एकीकडे हिंदुत्वाचा वापर केला म्हणून काही आमदारांची आमदारकी रद्द होते आणि दुसरीकडे काही नेते मंडळीच यापासून सुरुवात करतात, असा टोलाही खडसेंनी मोदींना लगावला.