सरकार वाचले; शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून जल्लोष
By Ajay.patil | Published: May 11, 2023 03:21 PM2023-05-11T15:21:13+5:302023-05-11T15:21:34+5:30
न्यायालयाच्या निर्णयाचे आमदारांनी केले स्वागत :
जळगाव - सर्वोच्च न्यायालयात शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला आहे. न्यायालयात शिंदे सरकारला दिलासा मिळाल्यामुळे गुरुवारी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेसमोर येवून, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्ह्याच्या महिला संपर्कप्रमुख सरीता माळी-कोल्हे, महानगरप्रमुख कुंदन काळे, नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, सोहम विसपुते, जितेंद्र गवळी, शोभा चौधरी यांच्यासह शिंदे गटाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील सरकार वाचले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेचे काम करत असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना अजून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याने सर्व शिवसैनिक आनंदात असून, हाच आनंद आम्ही फटाके फोडून व्यक्त करत असल्याचे मत जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील दोन्ही आमदारांनाही दिलासा...
शिवसेना शिंदे गटातील ज्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयाकडून निर्णय येणार होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील व चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांचाही सहभाग होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील दोन्ही आमदारांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायायलयाने या प्रकरणी आता विधानसभा अध्यक्षांकडेच निर्णय होणार असल्याचा निर्णय दिल्यामुळे दोन्ही आमदारांनाही दिलासा मिळाला आहे.