शिरसाळा मारुतीला तीर्थक्षेत्र दर्जाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:16 PM2020-03-19T22:16:59+5:302020-03-19T22:17:05+5:30
भाविकांचे श्रद्धास्थान : विकास कामे होण्याची अपेक्षा, पर्यटनाला मिळेल अधिक चालना
बोदवड : शहराच्या उत्तरेस मुक्ताईनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर शहरापासून बारा किमी अंतरावर प्रसिद्ध शिरसाळा मारुती मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यामुळे या स्थळाला तीर्थ क्षेत्राचा दर्जा देत या ठिकाणचा विकास करावा, अशी मागणी बºयाच दिवसांपासून प्रलंबीत आहे.
बोदवड तालुक्यातील शिरसाळा गावाबाहेर नदीकाठी एका निंबाच्या झाडाखाली बसवलेला हा मारुती आज शिरसाळा गावाची ओळख बनला आहे. याबाबत अख्यायिका अशी की, पुरातन काळात गावात असलेल्या एका व्यक्तीच्या स्वप्नात मारुतीने दृष्टांत दिला. त्यानुसार गावाबाहेर असलेल्या नदीतून मारुतीची पाषाण मूर्ती गावकऱ्यांनी गावात आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु सदर मूर्ती बारा गाड्या लावूनही हालत नसल्याने मामा -भाच्याकडून अलगद मूर्ती उचलली गेली. यानंतर निंबाच्या झाडाखाली ती बसवली. तेव्हापासून आज पर्यंत हा मारुतीराया उन, पाऊस व वारा झेलत असाच उभा आहे. अनेकांचा मनोकामना पूर्ण करीत आहे. अशाच भुसावळ तालुक्यातील द्वारकादास अग्रवाल या भाविकांची मनोकामना पूर्ण झाल्याने त्याने मंदिर बांधण्याचा संकल्प केला व मंदिर उभारले जात असताना कळसाचे काम सुरु केले, तेव्हाच ते आजारी पडले व कळस चढण्याचा आधीच पडून जात होता.
शेवटी त्यांनी कळस बांधणे सोडून दिले, व त्यांची प्रकृती ही सुधारली तेव्हा पासून आज पर्यंत मंदिरावर कळस नसल्याचा इतिहास आहे.
मान्यवर येतात दर्शनासाठी
या मंदिरात दर शनिवारी माजी मंत्री तसेच आमदार व खासदार दर्शनाला येत असतात. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या या स्थळास तीर्थस्थानाचा दर्जा मिळावा व यातून पर्यटन विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, सध्या कोरोनाबाबत खबरदारी म्हणून हे मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.