दहा दिवसानंतरही शिरसोलीला पाणी पुरवठा नाही
By admin | Published: June 12, 2017 05:56 PM2017-06-12T17:56:26+5:302017-06-12T17:58:00+5:30
पावसाळ्यात टंचाईच्या झळा : आणखी तीन दिवस पाणी पुरवठा लांबणार
Next
>आॅनलाईन लोकमत
शिरसोली,दि.१२ - ३५ हजार लोकसंख्या असलेल्या शिरसोली गावातील ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गावात १० दिवस झाल्यानंतरही पाणी पुरवठा झालेला नाही. पाणीपुरवठा करणाºया यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आणखी तीन दिवस पाणी पुरवठा लांबणीवर पडणार असल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात शिरसोलीकरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत.
सामुहिक पाणी पुरवठा योजना
शिरसोली प्र.न. व शिरसोली प्र.बो. या दोन्ही गावांसाठी दापोरा येथील गिरणा नदीजवळून सामुहिक योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असतो. त्यामुळे किमान पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा शक्य होत असतो. मात्र १० दिवस होऊन देखील पाणीपुरवठा झालेला नाही.
इलेक्ट्रीक मोटार नादुरुस्त
गेल्या आठवड्यात शिरसोली प्र.बो. या गावात पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर शिरसोली प्र.न. या गावात पाणीपुरवठा होणार होता. त्यानंतर वीज पुरवठा नसल्याने पाणी पुरवठा झाला नाही. तो सुरळीत झाल्यानंतर इलेक्ट्रीक मोटार नादुरुस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा लांबणीवर पडला आहे. या प्रकाराला तीन दिवस झाल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.
महिला व लहान मुलांची कसरत
शिरसोली ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे दहा दिवस झाल्यानंतरही पाणीपुरवठा होत नसल्याने महिला व लहान मुलांची पाण्यासाठी वणवण कायम आहे. चिंचपुरा, इंदिरानगर, अशोक नगर, बारीवाडा या भागातील हातपंप तसेच विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे.
आणखी तीन दिवस पाण्याची प्रतिक्षा
तब्बल १० दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नसताना अजून तीन ते चार दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात अजून तीन दिवस नागरिकांची पाण्यासाठी वणवण कायम राहणार आहे. ग्रामपंचायतीच्या या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज पुरवठा खंडीत होता. त्यानंतर इलेक्ट्रीक मोटार नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा लांबणीवर पडला. लवकर पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
अर्जुन काटोले, सरपंच, शिरसोली प्र.न.