बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...

By चुडामण.बोरसे | Published: November 7, 2024 10:41 AM2024-11-07T10:41:38+5:302024-11-07T10:44:32+5:30

'मी दिलीप भोळा (भोळे) यांना उमेदवारी देतोय', असं बाळासाहेब म्हणाले होते

Shiv Sena candidate Dilip Bhole was selected by one sentence of Balasaheb Thackeray What was the result read in detail | बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...

बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...

चुडामण बोरसे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: १९९५ च्या विधानसभा निवडणूक. प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भुसावळला आले होते. सभा सुरू होण्यापूर्वी त्यांनी अचानक मी दिलीप भोळा (भोळेंना बाळासाहेब भोळा असे संबोधायचे) यांना उमेदवारी देतोयं.... विजयी कराल ना... अशी जनसमुदायाला हाक दिली... आणि त्यांच्या एका वाक्याने शिवसेनेचा भुसावळात पहिला आमदार निवडून आला. विशेष म्हणजे या निवडणुकीत दिलीप भोळे यांनी दोन माजी आमदारांचा पराभव केला होता.

दिलीप भोळे हे रिक्षाचालक. त्यावेळी ते साधे शिवसेना कार्यकर्ते होते. ते जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जळगाव जिल्ह्यातून भुसावळ बाजार समितीत निवडून गेलेले शिवसेनेचे एकमेव संचालक होते. खरं तर भुसावळ विधानसभा मतदारसंघात त्यावेळी शिवसेनेच्यावतीने राजेंद्र दायमा यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भुसावळात आले होते. सभा सुरू झाली.

आपल्या भाषणापूर्वी ठाकरे यांनी खाली श्रोत्यांमध्ये बसलेले दिलीप भोळे यांना अचानक व्यासपीठावर बोलावून घेतले आणि मी आता 'दिलीप भोळा' यांना उमेदवारी जाहीर करतोयं... अशी घोषणा केली. ही घोषणा होताच उपस्थितांनी जोरदार होकार भरला आणि टाळ्यांचा कडकडाट केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या भाषणाचा एवढा परिणाम झाला की, झाडून शिवसैनिक कामाला लागले आणि भोळे हे ५६२७७ मते मिळवून निवडून आले. तर त्यांच्याविरोधात दोन माजी आमदार होते. या दोघांचा यात पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे माजी आमदार देवीदास नामदेव भोळे यांना ३३१०४ तर दुसरे माजी आमदार जनता दलाचे डी. के. चौधरी यांना ११३४२ मते मिळाली. विशेष म्हणजे देवीदास भोळे हे सन १९७८ मध्ये भुसावळ- मधूनच २२३४१ मते मिळवून निवडून आले होते तर चौधरी हे १९८५ मध्ये जनता पार्टीतर्फे ३६,४९५ मते मिळवून निवडून आले होते.

१९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दिलीप भोळे हे विजयी झाले. त्यांना ४४,५१४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार संतोष चौधरी यांना ३३.५५३ मते मिळाली होती.

Web Title: Shiv Sena candidate Dilip Bhole was selected by one sentence of Balasaheb Thackeray What was the result read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.