दोन टप्प्यांत केला शिवसेनेने भाजपचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:18+5:302021-05-31T04:14:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत शिवसेनेने भाजपच्या कार्यक्रम लावण्याची तयारी केली असून, पहिल्या टप्प्यात भाजपचे २७ नगरसेवक फोडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत शिवसेनेने भाजपच्या कार्यक्रम लावण्याची तयारी केली असून, पहिल्या टप्प्यात भाजपचे २७ नगरसेवक फोडून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर, आता शिवसेनेने दुसऱ्या टप्प्यात भाजपचे काही नगरसेवक आपल्या बाजूने घेण्याची रणनीती आखली असून, आता बंडखोर नगरसेवकांचा गट तयार करून बंडखोर नगरसेवकांचे अपात्रतेच्या प्रकरणाची हवा काढण्याची तयारी सेनेने सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात २७ नगरसेवक फोडल्यानंतर, आता शिवसेनेने दुसऱ्या टप्प्यातही भाजपला दणका देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार, शनिवारी भाजपचे तीन नगरसेवक फोडल्यानंतर बंडखोर नगरसेवकांची संख्या ३० वर आली आहे. भाजपने दाखल केलेल्या अपात्रतेच्या प्रस्तावाबाबत भेटण्यासाठी बंडखोर नगरसेवकांना ३८ नगरसेवकांचा गट तयार करावा लागणार आहे. हा गट तयार झाला, तर बंडखोर नगरसेवकांवर असलेली अपात्रतेची तलवारही बोथट ठरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने दुसऱ्या टप्प्यात भाजपचे नगरसेवक आपल्या बाजूने खेचण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शिवसेनेकडून उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर दुसऱ्या टप्प्यात भाजपचा कार्यक्रम लावण्यासाठी जबाबदारी टाकली आहे. त्यानुसार, पिंप्राळ्यातील तीन नगरसेवक सेनेच्या गोटात सहभागी झाले असून, आता उर्वरित नगरसेवकांची मने वळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ढेकळे, पाटील यांच्याशी संपर्क
भाजपकडून शिवसेनेचे सदाशिवराव ढेकळे, डॉ.चंद्रशेखर पाटील, लता भोईटे यांच्यासह ६ नगरसेवकांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसून, येत्या दोन दिवसांत अजून काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे, तसेच आता भाजपनेही आपले नगरसेवक राखण्यासाठी आपला बी प्लान तयार करण्याची शक्यता आहे.