पाचोरा येथे वीज कंपनीविरोधात शिवसेनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:20 PM2019-07-29T21:20:20+5:302019-07-29T21:21:06+5:30
नवीन विद्युत मीटर बसविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
पाचोरा, जि.जळगाव : नवीन विद्युत मीटर बसविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
राज्य वीज कंपनीकडून शहरात वीज ग्राहकांची जादा वीज बिल आकारणी करून लुटमार होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. नवीन मीटर बसवून वीज ग्राहकांना भरमसाठ बिले पाठविली आहेत. तेव्हा तातडीने नवीन मीटर काढून जुने मीटर बसवावे व वीज बिले कमी करावी यासाठी पाचोरा येथे शिवसेनेतर्फे सोमवारपासून तहसील कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शहरात एका कंपनीचे नवीन मीटर सक्तीने वीज ग्राहकांकडे बसविले जात असून, जुने चांगले मीटर काढून नेले जात आहेत. नवीन मीटर बसविल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आकारणी केली जात आहे .नवीन मीटर जोरात फिरत असून जास्त युनिट आकारणी होत आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी निवेदनाद्वारे वीज मंडळाला इशारा दिला होता. वीज कंपनीने नवीन मीटर बसवणे तूर्त थांबवले. मात्र शहरात बहुतेक ठिकाणी नवीन मीटर सक्तीने बसविल्याने लुटमार सुरूच आहे. ही लूटमार थांबवावी, जुने मीटर पुन्हा बसवावे, नवीन मीटर काढून घ्यावे यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर हे शिवसैनिकांसह बेमुदत उपोषणास बसले आहेत. उपोषणस्थळी आमदार किशोर पाटील यांनी भेट देऊन तातडीने कारवाई करण्याच्या वीज वितरण कंपनीला सूचना केल्या. उपोषणास शहरातून पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख मंदाकिनी पाटील, बेबाबाई पाटील यांच्यासह महिला आघाडी शिवसैनिक उपस्थित होते.