मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे परिचारिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 03:27 PM2021-05-12T15:27:39+5:302021-05-12T15:27:54+5:30
उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मुक्ताईनगर : कोरोना महामारीच्या संकट काळात रुग्णांची शुश्रूषा आणि कर्तव्य बजाविण्यासाठी कणखरपणे सेवा देणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तब्बल सव्वा वर्ष लोटले. कोरोना संसर्गजन्य आजाराने अवघे जीवनमान बदलवून टाकले. माणसं माणसापासून दुरावली. सुरक्षित अंतर हा जरी उपाय असला तरी बाधित रूग्णांना आपुलकी सेवा सुश्रुषक देऊन रुग्णालयातील परिचारिका सामाजिक बांधिलकी घेतलेल्या सेवाव्रत कार्याची पूर्ती करून रुग्णांना आधार देत आहे. स्वतःचे जीव धोक्यात घालून त्यांची रुग्णसेवा आज अनेक रुग्णांसाठी जीवनदायी बनत आहे. कोविड रुग्णांच्या सेवा समर्पणासाठी या परिचारिका स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांपासून लांब आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची, तर घरी कुटुंबाला संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेची काळजी अशा स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या अधिपरिचारिका व परिचारिका या कोरोना योद्ध्यांचा सत्कार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना परिवाराच्या वतीने गुलाबपुष्प भेट देऊन करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, शहर संघटक वसंत भलभले, महिला आघाडी शहर संघटिका सरीता कोळी, पप्पू मराठे, संतोष माळी आदींची उपस्थिती होती.
परिचारिका म्हणतात...
कोरोना संसर्गजन्य आजार आमच्या क्षेत्राची सत्वपरीक्षेचा काळ होय. सुरुवातीला मनात थोडी भीती वाटली. मानसिक दडपणही आले. परंतु आयुष्यात कठोर प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणे हाच पर्याय असतो. रुग्ण संख्या वाढतच आहे. मात्र रुग्ण बरा होऊन डिस्चार्ज होताना आपण केलेल्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते, अशी भावना सत्कारप्रसंगी सर्व परिचारिकांनी व्यक्त केली व सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.