आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:56+5:302021-06-05T04:12:56+5:30
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी चंद्रकांत सोनवणे : जिल्हाप्रमुखपदी चंद्रकांत पाटील व समाधान महाजन यांची निवड लोकमत न्यूज नेटवर्क ...
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी चंद्रकांत सोनवणे : जिल्हाप्रमुखपदी चंद्रकांत पाटील व समाधान महाजन यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका व भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेने संघटनात्मक मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने तब्बल चार जिल्हाप्रमुख, तर दोन सहसंपर्कप्रमुख यांची नियुक्ती केली असून, शुक्रवारी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदी चंद्रकांत पाटील व समाधान महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुखपदी प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेत याआधी जिल्ह्यात दोन जिल्हाप्रमुख अशी नियुक्ती करण्यात येत होती. मात्र, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मिळत असलेल्या यशामुळे शिवसेनेने आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यात सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तसेच एक हजारहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी जळगाव लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष व सहसंपर्कप्रमुख यांची नियुक्ती केल्यानंतर, शुक्रवारी रावेर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभानिहाय जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जामनेर, मुक्ताईनगरची जबाबदारी चंद्रकांत पाटलांकडे
तीन विधानसभांसाठी एक जिल्हाप्रमुख अशी नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली असून, रावेर, जामनेर व मुक्ताईनगर या तालुक्यांची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, तर समाधान महाजन यांच्याकडे भुसावळ व चोपडा विधानसभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे सहसंपर्क प्रमुखपद हे देण्यात आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात चोपडा व मुक्ताईनगर तालुक्याव्यतिरिक्त इतर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी आहे. त्यामुळे इतर मतदारसंघांमध्ये सेनेचे संघटन वाढविण्यास सोबतच मतदार वाढवण्याचे आव्हानदेखील शिवसेनेसमोर कायम राहणार आहे.
जळगाव शहरातही बदलाचे संकेत
रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघातील फेरबदल झाल्यानंतर आता जळगाव शहरातदेखील शिवसेनेच्या संघटनेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील शिवसेनेच्या संघटनेमध्ये असलेले अंतर्गत वाद, जुने व नवे शिवसैनिक अशी गटबाजी दिसून येत आहे. महानगरपालिकेत शिवसेनेने सत्ता घेतल्यामुळे आता शिवसेनेकडून शहरातदेखील संघटनवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. महानगर शिवसेनेतदेखील बदल होण्याची शक्यता शिवसेनेच्या सूत्रांनी वर्तवली आहे.