गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:52 IST2024-12-12T14:49:59+5:302024-12-12T14:52:12+5:30
देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीआधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं
Shiv Sena Gulabrao atil ( Marathi News ) : "विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील ज्या ८४ हजार मतदारांनी गुलाबराव देवकर यांना मतदान केले, पक्षबदलाच्या हालचाली करताना त्या मतदारांचा तरी विचार देवकरांनी करायला हवा होता. निकाल जाहीर होऊन, काही दिवस उलटले असतानाच, देवकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोडून अजित पवार गटात जाण्याची तयारी करत आहेत. आता आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आम्ही काय म्हणायचे?" अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री व जळगाव ग्रामीण मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार गुलाबराव देवकर यांना डिवचलं आहे.
पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी देवकरांवर जोरदार टीका केली आहे. "हा निर्णय निवडणुकीच्या आधी देवकरांनी का घेतला नाही? आधी शरद पवार त्यांचे नेते होते. आता त्यांना अजित पवार हे जास्त जवळचे वाटायला लागले आहेत. निवडणुकीनंतरच्या दहाच दिवसात अशी काय अडचण झाली की, त्यांना पक्षांतर करावे लागत आहे," असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
काही प्रकरणांतून स्वतःला वाचवण्यासाठी सत्तेत जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, असंही पाटील म्हणाले. देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीआधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळाला नाही. म्हणून आता अजित पवार गटात जाण्याच त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपीह पाटील यांनी केला.
देवकर म्हणतात 'नो कमेंट'
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत गुलाबराव देवकर यांचं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, देवकर यांनी या आरोपांबाबत काहीही बोलणार नसल्याचे सांगितले.