शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांनी दाखल केली उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:15 AM2021-03-18T04:15:29+5:302021-03-18T04:15:29+5:30
जळगाव : मनपाच्या गुरुवारी होणाऱ्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी ...
जळगाव : मनपाच्या गुरुवारी होणाऱ्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अडीच वर्षात सत्ताधारी भाजपने जळगावकरांना दिलेला शब्द न पाळल्याने सत्ताधाऱ्यांवर ही वेळ आली असून, आता महानगरपालिकेवर केवळ शिवसेनेची एक हाती सत्ता येईल असा विश्वास दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केला.
मनपा नगर सचिव सुनील गोराणे यांच्याकडे दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विलास पालकर, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, ललित कोल्हे, राखी सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, इब्राहिम पटेल, गणेश सोनवणे, अमर जैन, ज्योती तायडे यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडणार आहे. त्यात दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारची शेवटची मुदत होती. त्यामुळे बुधवारी शिवसेनेकडून महापौर व उपमहापौर पदासाठी दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. भाजपच्या ३० नगरसेवकांनी ऐनवेळी बंडखोरी केल्याने भाजप ‘बॅक फूट’ वर गेला आहे. त्यामुळे भाजप नेते सावध पावले टाकत आहेत.
बंडखोर कुलभूषण पाटील जळगावात परतले
भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांना शिवसेनेकडून उपमहापौर पदाची संधी मिळाली आहे. बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जळगावात परतले. त्यांच्यासोबत भाजपचे सभागृह नेते तथा माजी महापौर ललित कोल्हे तसेच इतर नगरसेवक देखील जळगावात दाखल झाले आहेत. हे सर्वजण शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत अर्ज दाखल करताना सोबत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना कुलभूषण पाटील म्हणाले की, आमची कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक नाराजी नव्हती. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. निर्णय प्रक्रियेत डावलले गेले. भाजपकडे बहुमत होते. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय होणे अपेक्षित होते. शहराच्या विकासाची जबाबदारी ही स्थानिक आमदारांवर असताना त्यांनी सातत्याने ठेकेदारीला पाठबळ दिले. आम्ही हा विषय वेळोवेळी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे मांडला. पण त्यांनीही लक्ष दिले नाही. शेवटी आम्हाला नाईलाजाने शिवसेनेसोबत जाण्याचा हा निर्णय घ्यावा लागला. मी शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही पदांवर विजय आमचाच- जयश्री महाजन
शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी यावेळी सांगितले की, मी शिवसेनेकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी संख्याबळाबाबत आश्वस्त केले आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही पदांवर आमचा विजय होईल, अशी आपल्याला खात्री असल्याचे जयश्री महाजन यांनी सांगितले.