मंत्री एकनाथ शिंदेंचं बंड, जळगावातील शिवसेनेचे आमदार कुठं?; वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:13 PM2022-06-21T14:13:29+5:302022-06-21T14:15:06+5:30
मंत्री शिंदेंसोबत जळगाव जिल्ह्यातील काही आमदार असल्याचं सांगितलं जातंय.
प्रशांत भदाणे
जळगाव : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याने ठाकरे सरकार धोक्यात आलंय. मंत्री शिंदेंसोबत जळगाव जिल्ह्यातील काही आमदार असल्याचं सांगितलं जातंय. जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत, तर एक अपक्ष आमदार हा शिवसेनेचा सहयोगी आमदार आहेत. या पाच आमदारांपैकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह दोन आमदार हे मुंबईत तर एक आमदार दिल्लीत आहेत. मंत्री शिंदेंसोबत जिल्ह्यातील फक्त एक आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे किशोर पाटील, चोपड्याच्या लता सोनवणे यांचा समावेश आहे. तर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार शिवसेनेचे सहयोगी आमदार आहेत. यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आणि चिमणराव पाटील हे मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फोनवरून आपण मुंबईत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. आमदार चिमणराव पाटील व चंद्रकांत पाटील यांचा फोन नॉट रिचेबल आहेत. पण ते मुंबईतच असल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदार लता सोनवणे या वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीत आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती माध्यमांना दिलीये. फक्त पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे नॉट रिचेबल आहेत. ते मंत्री शिंदेंसोबत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निकटवर्तीयांना देखील त्यांच्या लोकेशनबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाहीये.
आमदार किशोर पाटील हे मंत्री शिंदेंच्या जवळचे
आमदार किशोर पाटील हे मंत्री एकनाथ शिंदेंच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. त्यामुळे ते शिंदेंसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांच्या बाबतीत संभ्रमाची स्थिती आहे. ते मंत्री शिंदेंच्या बाजूने जाऊ शकतात किंवा नाही, याबाबत ठोस माहिती मिळाली नाही.