Jalgaon News: शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांचा पुन्हा एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप; नेमका 'काय' आरोप केलाय वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 01:26 PM2022-01-18T13:26:24+5:302022-01-18T13:27:04+5:30
बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंवर धक्कादायक आरोप केलाय.
जळगाव : राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर मात्र तीव्र मतभेद असल्याचं वारंवार समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. या वादात पुन्हा भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. हा आरोप करताना आमदार पाटील यांनी खडसे यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा रोख हा खडसेंकडेच असल्याचे स्पष्ट होत आहे.
बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंवर धक्कादायक आरोप केलाय. 'बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून स्थानिक प्रमुख कार्यकर्ते बाजूला रहावेत, म्हणून खोटेनाटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या साऱ्या प्रकरणासंदर्भात आपण राज्य शासनाकडे बाजू मांडली आहे. तसेच पोलीस प्रशासनाला पुरावे दिले आहेत. या सार्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
असं द्वेषाचं राजकारण करणं चुकीचं
एकनाथ खडसे यांना लक्ष्य करताना आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही सत्तेत आहात म्हणून अशा प्रकारे द्वेषाचे राजकारण करणं चुकीचं आहे. ज्यावेळी सारा प्रकार घडला तेव्हा; ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ते शिवसेनेचे पदाधिकारी कुठे होते? याचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत. त्याचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.
भाजपसोबत युतीच्या वृत्ताचे केलं खंडन
आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत युती केल्याच्या चर्चेचे खंडन केले. दोन दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली. ही भेट आकस्मिक होती. त्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. आज होणाऱ्या चार जागांच्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना आणि भाजप आमने-सामने लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीच्या 17 पैकी 17 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील आणि नगराध्यक्ष शिवसेनेचाच विराजमान होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आम्हाला पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास- ऍड. रोहिणी खडसे
दरम्यान, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर केलेल्या आरोपाला खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे. पोलीस तपासात सत्य बाहेर येईलच. पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे प्रत्युत्तर रोहिणी खडसे यांनी दिलंय.