शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे जलसंपदा मंत्र्यांना विचारणार जाब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:02 AM2019-01-29T01:02:21+5:302019-01-29T01:05:09+5:30
विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
पाचोरा, जि.जळगाव : विधीमंडळातील कामकाजात जिल्ह्यातील प्रश्न उपस्थित करतो, जामनेर मतदारसंघात डोकावत नाही. मंत्री गिरीश महाजन हे माझे दुश्मन नाही. पाचोरा तालुक्यातील गावे त्यांच्या मतदारसंघास जोडल्याने तेथे विकास होत नसल्याने खंत वाटते व जलसंपदा मंत्री असून एकही काम अद्याप झाले नसल्याने मी जाब विचारणारच, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
एका आगळ्या वेगळया कार्यक्रमात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर आमने सामने आणून जनतेच्या सडेतोड प्रश्नांवर उत्तरे देण्यास भाग पाडणारा कार्यक्रम २७ रोजी रात्री ९ वाजता पाचोरा येथील मानसिंघका मैदानावर पार पडला.
येथील प्रागतिक विचार मंच संघटनेतर्फे आयोजित ‘लोकशाही महोत्सव’ ह्या कार्यक्रमात ‘प्रश्न जनतेचे, उत्तर लोकप्रतिनिधींचे’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यमान आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांना एकाच मंचावर आमनेसामने बोलावून जनतेच्या लेखी प्रश्नांवर उत्तरे जाणून घेतली.
दीड तास चाललेल्या कार्यक्रमात एकूण प्रश्नांपैकी १४ प्रश्नच चर्चेला घेतले गेले. त्यावर उभयतांनी दिलखुलासपणे सडेतोड उत्तरे देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केला.
यावेळी आयोजकांनी स्वीकारलेल्या लेखी प्रश्नांचे वाचन करून गेल्या १० वर्षातील आजी माजी आमदारांची सत्ताधारी आमदार म्हणून असलेली कारकीर्द मतदारसंघात कोणती कामे कशी केली, भविष्यातील व्हिजन काय? काय करायला हवे होते, असे प्रश्न उपस्थित केले. यावर माजी आमदार दिलीप वाघ यांनी १०० कोटींची कामे केल्याचा दावा केला तर विद्यमान आमदार यांनी चार वर्षात ५०० कोटींची कामे केल्याचा दावा केला.
यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना उभयतांनी समर्पक उत्तरे दिली. यात शहराचा पाणीप्रश्न, रोजगार निर्मिती, शहरातील महात्मा फुलेंचा पुतळा, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न, राजकीय कारकीर्द यावर सडेतोड उत्तरे दिली.
यावेळी विचारलेल्या प्रश्नांत प्रामुख्याने पाचोरा शहरातील पाणी प्रश्न सतत भेडसावत असल्याने त्यावर उभयतांनी वेगवेगळे पर्याय दिले. यात दिलीप वाघ यांनी वाघूर प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर किशोर पाटील यांनी गिरणा प्रकल्पातून पाईपलाईन टाकून पाणी आणण्यावर भर दिला. यावर दोघांचीही मतभिन्नता दिसून आली. म.ज्योतीबा फुले यांचा पुतळा उभारणीचे उभयतांचे प्रयत्न असल्याचे दिसले. रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून लवकरच हजारो बेरोजगारांना काम मिळवून देण्याची योजना हाती घेतल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी सहकार्य करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट करून कोणत्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आयोजक प्रागतिक विचार मंचचे नंदकुमार सोनार व सुनील शिंदे यांनी प्रश्नांचे वाचन केले. यावेळी आजी माजी आमदारांचे समर्थक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.