शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांना दणका; जातवैधता प्रकरणात उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:06 AM2022-06-10T11:06:04+5:302022-06-10T11:06:29+5:30
या निर्णयाच्या विरोधात त्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
जळगाव- जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयाने आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली. दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात त्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
आमदार लता सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने सोनवणे यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरुद्ध सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने याबाबत चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले होते. समितीने पूर्वीचा निर्णय दिल्याने आमदार सोनवणे पुन्हा खंडपीठात गेल्या होत्या. आता खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार सोनवणे खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देणार-
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला. खंडपीठाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती माजी आमदार सोनवणे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.