जळगाव जिल्हा परिषदेत आता नव्या प्रयोगासाठी शिवसेनेचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:35 PM2019-11-29T12:35:34+5:302019-11-29T12:36:24+5:30

नाट्यमय घडामोडीची शक्यता

Shiv Sena now trying new experiment in Jalgaon Zilla Parishad | जळगाव जिल्हा परिषदेत आता नव्या प्रयोगासाठी शिवसेनेचा प्रयत्न

जळगाव जिल्हा परिषदेत आता नव्या प्रयोगासाठी शिवसेनेचा प्रयत्न

Next

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली़ जिल्ह्यातही शिवसेनेची पॉवर वाढली आहे. या स्थितीत जिल्हा परिषदेत सत्तेत मिळविण्यासाठी सर्व पर्याय सेनेतर्फे आजमावले जात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत नाट्यमय घडामोडी समोर येण्याची शक्यता वाढली आहे़
गेल्या वेळी बहुमत नसताना राज्यात सत्ता असल्याने भाजपने सर्व समिकरणे जुळवून काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली व अध्यक्षपद मिळविले़ त्यावेळी राज्यात युती असतानाही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश आले होते़ शिवाय वारंवार युतीचे आश्वासने देऊनही स्थानिक राजकारणात त्याचे पालन न झाल्याने शिवसेना सदस्यांनी नेहमीच यावर नाराजी व्यक्त केली होती़ शिवसेनेवर अभद्र युतीची टीका करणाऱ्या भाजपने याआधीच जिल्हा परिषदेत अशी विरोधाभासी युती केली असल्याने त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका आता शिवसेना सदस्यांकडून उघडपणे होत आहे़
सेनेकडे पर्याय कसे ?
महाविकास आघाडीत दोन सदस्य अपात्र असल्याने अडचणी वाढल्या आहेत़ या दोन सदस्य अपात्रतेचा मुद्दा यात कळीचा मुद्दा ठरणार आहे़ ते स्पष्ट झाल्यानंतर सर्व गणिते स्पष्ट होतील़
भाजपाला केवळ एका जागेची आवश्यकता आहे़ मात्र, अध्यक्षपदासाठी कोणते नाव समोर येते यावरून भाजपच्या गटा-तटाची गणिते अवलंबून राहतील, अध्यक्षपदावरून नाराज गट थेट त्यांच्या सोयीचे अध्यक्ष निवडण्यासाठी सेना-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ शकतात़ यात शिवसेनेला उपाध्यक्षपदाची संधी अधिक असल्याचे समजते त्यात सदस्य नानाभाऊ महाजन व रावसाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत़ त्यामुळे सेनेकडे हा एक पर्याय खुला आहे़ आमदार गुलाबराव पाटील काय भूमिका घेतात? यावर सर्व चित्र अवलंबून राहणार आहे़ मात्र, सत्तेत येण्यासाठी पूर्ण प्रयत्न होतील, असा दावा सेनेकडून होत आहे़
अशी वाढली ताकद
जिल्ह्यात सेनेने लढविलेल्या सर्व जागांवर त्यांचा विजय झाला आहे़ गेल्यावेळी पेक्षा यंदा जागा वाढल्याने शिवाय पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील यांना मिळणार असल्याचे संकेत असल्याने सेना जिल्ह्यात अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे़ त्यामुळे नेते विकासाच्यादृष्टीने सोयीचे म्हणून या ठिकाणी सत्तेत सहभागी होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतील, असा दावा सेना सदस्यांनी केला आहे़ शिवाय येत्या एक दोन दिवसात यावर बैठकही होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़
जि़ प़ तील ‘संजय राऊत’ कोण?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून सुरूवातीपासून किल्ला लढविला होता़ जिल्हा परिषदेत तशी भूमिका कोण पार पाडणार? अशीही एक चर्चा आता रंगत आहे़
अध्यक्षपदासाठी खडसे गट आग्रही
आम्हाला पक्षाकडून अध्यक्षपदाची संधी मिळेल असा विश्वास आहे, मात्र, तसे न झाल्यास समोरच विरोध दर्शवून आमची भूमिका आम्ही ठरवू असा एक सूर खडसे गटाकडून लावला जात आहे़ शिवसेनाही त्या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते़ अडीच वर्षात अधिकारी शिरजोर झाले, कामे थांबली, बोलणारे कुणी नसल्याने हा सर्व खोळंबा झाल्याचा आरोप होत आहे. पुन्हा तसे होता कामा नये यासाठी अध्यक्षपद हे बोलणाºया व्यक्तिस द्यावे, असा प्रयत्न खडसे गटाकडून सुरु आहे.

Web Title: Shiv Sena now trying new experiment in Jalgaon Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव