स्विकृत नगरसेवकावरून शिवसेनेत पुन्हा खेचाखेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:50+5:302021-07-07T04:18:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवसेनेचा मुख्यमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्रीपद शिवसेनेकडे, सर्वाधिक आमदार सेनेचे व जळगाव महापालिकेत देखील महापौर व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवसेनेचा मुख्यमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्रीपद शिवसेनेकडे, सर्वाधिक आमदार सेनेचे व जळगाव महापालिकेत देखील महापौर व उपमहापौर शिवसेनेचेच अशी स्थिती आहे. एकीकडे सेनेचा सुवर्णकाळ सुरु असताना, दुसरीकडे मात्र सेनेला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. आता महापालिकेतील सेनेची रिक्त झालेली एका स्विकृत नगरसेवकाच्या जागेवरून सेनेत पुन्हा खेचाखेची सुरु झाली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्ष नेतृत्वासमोरदेखील नवा पेच निर्माण झाला आहे.
सेनेचे स्विकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा देवून आता तीन महिने पुर्ण झाले आहेत. मात्र, ही रिक्त असलेली एक जागा देखील शिवसेनेला अजूनही भरता आलेली नाही. कारण जागा एक आणि इच्छुक अनेक असल्याने कोणाची नियुक्ती या जागेवर करावी असा पेचप्रसंग सेना नेतृत्वासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे स्विकृत नगरसेवकपदाची जागा तीन महिन्यांपासून रिक्तच ठेवण्यात आली आहे. या एका जागेवरून सेनेत असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने सेना नेतृत्वाने देखील स्विकृत नगरसेवकाची निवड प्रक्रिया आता जितकी लांबेल तितकी लांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आता सेनेच्या अंतर्गत गोटात रंगू लागली आहे.
जुने-नवीन वाद वाढला
शिवसेनेत गेल्या काही वर्षांपासून जुने शिवसैनिक व नवे शिवसैनिक असा वाद निर्माण झाला आहे. त्याचा प्रत्यय शहरात गेल्या काही वर्षात झालेल्या शिवसेनेच्या आंदोलनात देखील दिसून आला होता. आता स्विकृत नगरसेवकाची एक जागा आपल्याकडे मिळावी यासाठी नवीन - जुन्या शिवसैनिकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच ही जागा आता अनेकांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे केवळ एका जागेवरून सेनेत नवा संघर्ष निर्माण झाला आहे. सेनेतील एक गट गजानन मालपुरे यांच्यासाठी आग्रही आहे. तर दुसरा गट विराज कावडीया यांच्यासाठी आग्रही आहे. तर इतर गट जाकीर पठान, दिनेश जगताप, निलेश पाटील यांच्यासाठी आग्रही आहे. महापालिकेत तब्बल ४५ नगरसेवकांचे बहूमत असलेल्या सेनेत आता एका स्विकृत सदस्याचा जागेवरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
कोट..
अद्याप स्विकृत नगरसेवक पदासाठी कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत बैठक घेतल्यानंतर एक नाव निश्चित केले जाईल. सेनेत या जागेवरून कोणताही वाद नसून, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाप्रमाणे अंतीम निर्णय होईल.
-शरद तायडे, महानगरप्रमुख, शिवसेना