"चिन्हं राहू द्या, आमची बांधिलकी..."; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

By विजय.सैतवाल | Published: October 8, 2022 11:45 PM2022-10-08T23:45:00+5:302022-10-08T23:47:06+5:30

ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दावे-प्रतिदावे

Shiv Sena Symbol Bow and Arrow Freeze by Election Commission party workers react in different manner | "चिन्हं राहू द्या, आमची बांधिलकी..."; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

"चिन्हं राहू द्या, आमची बांधिलकी..."; 'धनुष्यबाणा'च्या निर्णयावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले गेले असले तरी चिन्ह महत्त्वाचे नसून आमची बांधिलकी ठाकरे कुटुंबीयांशी आहे, आम्ही कायम ठाकरे कुटुंबीयांसोबत असून काहीही झाले तरी अधिकृत शिवसेनेचा उमेदवारच विजयी होईल, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जात आहे. तर निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविणारा निर्णय आहे, अशा भावना शिंदे गटाकडून व्यक्त केल्या जात आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून त्या ठिकाणी शिवसेना हे नावदेखील वापरतात येणार नसल्याचा निर्णय दिला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता वरील दावा करण्यात आला.

राज्यातील सत्तांतरानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेना व शिवसेनेचे सहयोगी सर्वच आमदार शिंदे गटासोबत गेल्याने एकही आमदार ठाकरे गटासोबत नाही. असे असले तरी जिल्हाप्रमुख, जळगाव महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी ठाकरे गटासोबत कायम आहेत. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकासंदर्भात कोण कोणासोबत असणार याविषयीची उत्सुकता आहेच  त्यात शिवसेना नेमका कोणाचा व धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतरित्या कोणाचे याविषयी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यात अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाने शनिवारी निर्णय देत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवीत असल्याचे व शिवसेना नावदेखील वापरता येणार नसल्याचे जाहीर केले. यासंदर्भात ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त होत असताना शिंदे गटाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

दोन्ही गटाचे नेते काय म्हणतात?

अंधेरी पोट निवडणूक शिंदे गट व भाजप एकत्र लढवीत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या अशा कृत्याला आम्ही भीक घालत नाही, त्या ठिकाणी शिवसेनेचा ठाकरे गट विजयी होईल. मात्र शिंदे व भाजप गटाकडून होणारे प्रयत्न दुर्दैवी आहे, याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. -संजय सावंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख, जळगाव

आजचा निर्णय धक्कादायक आहे. एक प्रकारे हा ठाकरे गटावर अन्याय असून यापुढे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहील. आम्ही बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेले असून त्यांच्याशी कायम बांधिलकी राहणार आहे. भविष्यात धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटालाच मिळेल, असा विश्वास आहे. -विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

आम्ही ठाकरे कुटुंबांशी एकनिष्ठ असून यापुढे जे चिन्ह मिळेल त्यासोबत आम्ही राहू. ठाकरे कुटुंबियांशी असलेले ऋणानुबंध कधीही कमी होणार नाही. -जयश्री महाजन, महापौर, जळगाव मनपा

निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो योग्य असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविणारा आहे. -आमदार चंद्रकांत पाटील, शिंदे गट

निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वकच घेतलेला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. -आमदार चिमणराव पाटील, शिंदे गट.

Web Title: Shiv Sena Symbol Bow and Arrow Freeze by Election Commission party workers react in different manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.