पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:53+5:302021-02-06T04:26:53+5:30
जळगाव - पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेकडून प्रत्येक तालुक्याचा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलन करून, केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध ...
जळगाव - पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेकडून प्रत्येक तालुक्याचा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलन करून, केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडी संघटक महानंदा पाटील, आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील, लता सोनवणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. जळगाव शहरात महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन केले जाणार आहे.
परफ्यूमच्या बाटलीचा स्फोट होऊन महिला सफाई कर्मचारी जखमी
जळगाव - शहरातील नेरी नाका सेंटर नं १३ मध्ये साफसफाई करताना कचऱ्याला लावलेल्या आगीत परफ्यूमच्या बाटलीचा स्फोट झाल्याने मनपाच्या सफाई कर्मचारी सिंधू सोनवणे या जखमी झाल्या. शनिवारी सकाळी ७ वाजेची ही घटना असून, त्यांच्या चेहरा काही प्रमाणात भाजला गेला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मनपाची महिला सफाई कर्मचारी जखमी झाल्यानंतरदेखील मनपाच्या वैद्यकीय विभाग किंवा प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने मदत न केल्याने या महिलेच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी
जळगाव - शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न बिकट झाला असून, गुरुवारी सकाळी ७ वाजता तालुका पोलीस स्टेशन परिसरात एका १० वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये सुदैवाने काही युवकांनी कुत्र्यांना हटकल्याने मुलाला किरकोळ जखमा झाल्या. दरम्यान, खोटेनगर भागात हा प्रश्न गंभीर झाला असून, मनपा प्रशासनाने व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.
ग.स.मधील कारभाराची चौकशी करा
जळगाव - ग.स.सोसायटीमधील नोकर भरती, बिंदू नामावली, रिक्त पदांची भरती, पदोन्नतीच्या अनुषंगाने संचालकांनी केलेल्या अनागोंदी कारभाराबाबत चौकशी करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी.पी. केदार, बापू साळुंखे, रवींद्र तायडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जनता दरबारात तक्रारींचा पाऊस
जळगाव - मनपा उपमहापौर सुनील खडके यांनी गुरुवारी मनपात जनता दरबाराचे आयोजन केले होते. या उपक्रमादरम्यान, शहरातील ४०० हून नागरिकांनी आपल्या तक्रारी उपमहापौरांकडे सादर केल्या. यामध्ये शहरातील रस्त्यांचा प्रश्नावरच जास्त समस्या होत्या. तसेच खड्ड्यांमुळे तर मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, सर्वाधिक त्रास हा रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे होत असल्याने धुळीबाबत मनपाने लवकर उपाययोजना करण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करा, अशी मागणी नागरिकांनी केली. यासह आरोग्याचा व अस्वच्छतेबाबतदेखील नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या.