कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी भुसावळात शिवसेनेचा सहाय्यता कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:21 PM2021-04-14T16:21:53+5:302021-04-14T16:22:19+5:30
कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी शिवसेनेचा सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
भुसावळ : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांना बेड मिळवताना कसरत करावी लागते आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातलगांच्या मदतीसाठी भुसावळ शहर शिवसेनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कक्ष स्थापन केला आहे.
कोरोना सहायता कक्षाच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत करण्यात येणार आहे. तसेच शासकीय दरानुसार बिलांची पडताळणी करण्यात येईल. कक्षाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जागृती केली जाईल. तसेच विविध रुग्णालयातून रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवण्याचे काम केले जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत कक्षात सोशल डिस्टन्सचे पालन करीत नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले जाईल.
शहरात कोरोना सहायता कक्षामध्ये शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहरप्रमुख पवन नाले, धनराज ठाकूर, गोकुळ बाविस्कर, शरद जोहरे यांचा समावेश आहे.