राजकीय दडपशाहीविरुद्ध शिवसेनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:59+5:302021-09-21T04:18:59+5:30
मुक्ताईनगर : नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी मुक्ताईनगर शहर शिवसेनेच्या वतीने प्रवर्तन चौक ते ...
मुक्ताईनगर : नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी मुक्ताईनगर शहर शिवसेनेच्या वतीने प्रवर्तन चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत निषेध मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १८ सप्टेंबर रोजी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी खडसे परिवारावर फेसबुकवर पोस्ट केल्याच्या द्वेषापोटी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील काशीनाथ पाटील यांच्या विरुद्ध निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मुळात ही मागणी चुकीची असून, भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांवर गदा आणणारी ही मागणी असून, माजी मंत्री त्यांच्या कुटुंबीयांवर भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी कारवाई सुरू आहे. तसेच जावई गिरीष चौधरी हे अद्यापही अटकेत आहेत. अशा व्यक्तींचा साहजिकच सर्वसामान्य भ्रष्टाचारीच उल्लेख करणार. अशा सोशल मीडियात नागरिकांच्या भावना व्यक्त होत असतानाच सुनील पाटील यांनीदेखील त्यांचे मत व्यक्त केले आहे. व त्यात काही गैर नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून खडसे समर्थक कंपू खडसेंना भ्रष्टाचारी म्हणू नये म्हणून जनतेवर दबाव आणू पाहत असून ही बाब अतिशय धक्कादायक आहे. जोपर्यंत तपास यंत्रणा खडसे यांना क्लीन चिट देत नाही तोपर्यंत त्यांच्या समर्थकांचा हा पवित्रा चुकीचा आहे. मागेदेखील सुनील पाटील यांच्यावर याच लोकांनी खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने हा गुन्हा फेटाळला असून क्लीन चिट दिलेली आहे, असे निवेदनात नमूद केले असून, निषेध मोर्चा काढून पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन दिले.
मोर्चाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई यांनी केले. याप्रसंगी जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख अफसर खान, ल्हा आघाडी महिला संघटक कल्पना पालवे, उपतालुकाप्रमुख शिवाजी पाटील, नवनीत पाटील, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, भागवत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सतीश नागरे, पंकज पांडव, महेंद्र मोंढाळे, संतोष मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना, युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देताना छोटू भोई, नवनीत पाटील, शिवाजी पाटील, कल्पना पालवे आदी. (छाया : विनायक वाडेकर, मुक्ताईनगर)