युतीमुळे जिल्ह्यात शिवसेनेची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:56 PM2019-02-20T16:56:29+5:302019-02-20T16:57:22+5:30
चंद्रशेखर जोशी जळगाव : युती नसावी, किमान एक जागा मिळावी, यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आग्रही होते. यासाठी विविध ...
चंद्रशेखर जोशी
जळगाव : युती नसावी, किमान एक जागा मिळावी, यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आग्रही होते. यासाठी विविध व्यासपीठांवर पक्षाचे जिल्ह्यातील नेते भाजपावर टीका करत होते मात्र आता युती झाल्यामुळे या पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण झाल्याचे म्हणावे लागेल.
जिल्ह्यात भाजपाचे प्राबल्य असले तरी शिवसेनेचे आक्रमकता गेल्या काळात दिसून आली. सत्तेत भागीदार असले तरी शिवसेनेने सतत टीका भाजपावर केली. एवढेच नव्हे तर पक्षाचे उपनेते राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट पंतप्रधानांवरही टीका केली. याबाबत भाजपाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त झाली. जळगाव लोकसभा मतदार संघात सहा पैकी दोन विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार आहेत. पालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेत शिवसेना या मतदार संघात वरचढ आहे. मात्र प्रत्येक वेळी भाजपाने बाजी मारल्याचेच दिसून येते. अगदी उत्तमराव पाटील यांच्या काळापासून या पक्षाचे प्राबल्य या मतदार संघात आहे. पक्षाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. ती परंपरा केवळ एकदा खंडीत झाली. त्यानंतर पुन्हा भाजपाने बाजी मारल्याचा इतिहास आहे. यावेळी या मतदारसंघात शिवसेनेकडून यावेळी जय्यत तयारी झाली आहे. माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची जय्यत तयारी सुरू केली होती.
रावेरमध्ये आता काय भूमिका
रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचे प्राबल्य आहे. मंत्री गिरीश महाजन, एकनाथराव खडसे यांचे मतदार संघ या मतदार संघात येतात. या मतदार संघात दोन्ही नेत्यांनी शिवसेनेला वाढू दिले नसल्याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असते. तर जलसंपदा मंत्री यांनी ‘संपविण्याची भाषा’ शिवसेना पदाधिकाºयांच्या जिव्हारी लागली होती. पक्षाच्या पदाधिकाºयांनी याबाबत महाजन यांचे नाव घेऊन नाराजीही व्यक्त केली. युती झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांची अडचण झाली आहे.
नंदुरबारला गटातटात युती निष्फळ
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक असल्याने त्यात युतीचा निर्णयाचा फारसा प्रभाव पडणार नाही. तथापि, दोन्ही पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांच्या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रमाचे वातावरण होते. हा संभ्रम सोमवारी दूर होऊन युतीचा निर्णय झाला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील चित्र पाहता या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध डॉ.विजयकुमार गावीत गट असे सरळ राजकारण आहे. त्यात भाजपाचे अस्तित्व तिसºया क्रमांकावर आहे. तथापि, डॉ.गावीत यांनी गेल्या निवडणुकीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचाच परिणाम गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला होता.एकीकडे सोयीच्या राजकारण करणाºया कार्यकर्त्यांची संख्या अधिक असली तरी निष्ठावंत कार्यकर्तेही मात्र या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये मात्र युती झाल्याने समाधानाचे वातावरण आहे.
धुळे मतदारसंघात युतीचा भाजपला फायदाच
धुळे : लोकसभा निवडणुकीत भाजपा- सेना युतीची घोषणा झाल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाला याचा निश्चितच फायदा मिळणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळेसही भाजपा - सेनाने एकत्रच निवडणूक लढविली होती. यंदा युती झाली नसती तर मतदारसंघात सर्वच ठिकाणी मताची विभागणी झाली असती. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला असता आणि विरोधकांना त्याचा फायदा मिळाला असता. परंतु युती झाल्यामुळे मताची विभागणी थांबले आणि त्याचा फायदा निश्चितच भाजपाला लोकसभेत मिळणार आहे. कारण मालेगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. तेथून भाजपाला चांगली मदत मिळेल. पण धुळयात महापालिका निवडणुकीत भाजप - सेना नेत्यांचे संबंध दुरावले आहे. त्यांची मने जुळणे थोडे कठीण असल्याची स्थिती आहे.