एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; नगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 01:50 PM2022-02-18T13:50:11+5:302022-02-18T13:52:39+5:30
Bodwad Nagar Panchayat : जळगाव - जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी पार पडली. त्यात नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे.
- प्रशांत भदाणे
जळगाव - जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी पार पडली. त्यात नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झालीये. नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, शिवसेनेने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निवडणुकीत नशीब आजमावले. परंतु, त्यांच्या पदरी निराशा आली.
१० विरुद्ध ७ अशी मारली शिवसेनेने मजल
नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शिवसेनेकडून एक तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात शिवसेनेचे आनंदा पाटील हे निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात शिवसेनेचा १० तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने ७ मतं पडली.
भाजपने दिला सेनेला पाठिंबा
महिनाभरापूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 9 जागांवर सेनेने विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 तर भाजपला अवघी एक जागा जिंकता आली होती. त्यानंतर आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक विजय बडगुजर यांनी सेनेला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने 10 मतं पडली.
आमदार चंद्रकांत पाटील ठरले किंगमेकर
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील किंगमेकर ठरले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना या निवडणुकीत पिछाडीवर सोडलं. यापूर्वी बोदवड नगरपंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते. तेव्हा एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बोदवडची निवडणूक खडसे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. मात्र, त्यांना या ठिकाणी करिष्मा करता आला नाही. खडसेंना होमपीचवर हा मोठा धक्का मानला जात आहे.