दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शिवाजी लढतोय यंत्रणेशी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:41+5:302021-01-13T04:40:41+5:30

जळगाव : बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी गर्दी उसळेल... आमचे गाव लांब... सकाळी येणार कधी... वेळ निघून गेली तर... अशा ...

Shivaji is fighting for disability certificate with the system ... | दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शिवाजी लढतोय यंत्रणेशी...

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शिवाजी लढतोय यंत्रणेशी...

Next

जळगाव : बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी गर्दी उसळेल... आमचे गाव लांब... सकाळी येणार कधी... वेळ निघून गेली तर... अशा अनेक शंका मनात घेऊन पक्षाघाताचा त्रास मनातच गिळून... मेहुनबारेचे शिवाजी शंकर जाधव या दिव्यांग प्रौढाने मंगळवारी दुपारीच जळगाव गाठले होते.. वर्षभरापासूनची सुरू असलेली फरफट आतातरी थांबेल... ही आशा घेऊन त्यांनी जिल्हा रुग्णालयात रात्र काढली.

चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील रहिवासी शिवाजी जाधव (५०) यांची पानटपरी होती. यावरच कुटुंबाचा राहाटगाडा सुरू होता. २०१७ मध्ये अचानक पक्षाघात झाला. त्यात एक पाय आणि एक हात निकामी झाला. दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले; मात्र त्याचे नूतनीकरण होत नसल्याने शिवाजी जाधव यांना वर्षभरापासून भटकंती करावी लागत आहे. कोरोनात बंद असलेली यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाल्याचे समजले आणि त्यांनी चाळीसगाव येथे नोंदणी केली. वर्षभरापासून त्यांनी जिल्हा रुग्णालयात कागदपत्रे दिलेली आहेत तरीही नूतनीकरण होत नसल्याने ते चिंतित आहेत.

म्हणून ही फरफट

दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचे विकेंद्रीकरण व्हावे, स्थानिक पातळीवर तपासणी करून ते मिळावे, असा शासन आदेश आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप एकच केंद्र आणि तेही जळगावात असल्याने दूर राहणाऱ्या दिव्यांगांचीही फरफट होत आहे. याकडे संवेदनशीलतेने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाजी जाधव हे चटके सहन करीत आहेत. दरम्यान, या विकेंद्रीकरणाबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्रही देणार असल्याची माहिती आहे, किमान उपजिल्हा रुग्णालयात ही सेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोट

मेहुनबारे येथून सकाळी ९ वाजता चाळीसगाव गाडी आहे. तेथून जळगाव येण्यासाठी १२ वाजतील. तोपर्यंत वेळ निघून जाईल, म्हणून एक दिवस आधीच मी जळगाव गाठले आहे. आता रात्रभर मुक्काम करणार आहे.

- शिवाजी जाधव, दिव्यांग बांधव.

Web Title: Shivaji is fighting for disability certificate with the system ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.