शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य- अभिनेते डॉ.अमोल कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 06:35 PM2019-01-06T18:35:54+5:302019-01-06T18:38:05+5:30
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उदाहरण जगात सापडणे अशक्य आहे, अशी त्यांची थोरवी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी चाळीसगाव येथे ६ रोजी चाळीसगाव प्रिमीयर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
चाळीसगाव, जि.जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासाला पडलेले कोडे होते, तर देशाच्या इतिहासाला सोनेरी स्वप्न होते आणि महाराष्ट्राच्या मातीतील घडलेले एक आश्चर्य होते. सर्वसामान्य कुटुंंबात येवूनही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवात्वावर पोहचता येते, असे उदाहरण जगात सापडणे अशक्य आहे, अशी त्यांची थोरवी आहे, असे स्पष्ट मत अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी चाळीसगाव येथे ६ रोजी चाळीसगाव प्रिमीयर लिगच्या खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
य.ना.चव्हाण महाविद्यालयात प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कोल्हे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात् आले. अध्यक्षस्थानी खासदार ए.टी.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, राजीव देशमुख, आर.ओ.पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, के.बी.साळुंखे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, सतीष दराडे, कृ.उ.बा.सभापती रवींद्र चुडामण पाटील, वसंतराव चंद्रात्रे, अॅड. रोहित पाटील, रमेश सोनवणे, नाना पवार, उद्धवराव महाजन, धर्मराज वाघ, अरुण निकम, डॉ. संजय देशमुख, मंगेश पाटील, विश्वास चव्हाण, दगाजी जाधव, संयोजक कैलास सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी नारायणवाडीतील युवक व युवतीने शिववंदना व महाराजांची आरती म्हटली. प्रास्ताविक संयोजक व भारतीय कृषी व अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सूर्यवंशी यांनी केले. या कबड्डी स्पर्धेत एकूण १९२ संघातील एक हजार ९२० खेळाडू सहभागी झाले असून, त्यापैकी २० खेळाडूंचा चाळीसगाव संघ या नावाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व जिल्हा पातळीवर खेळेल व त्या माध्यमातून चाळीसगावचे नाव उंचावेल, अशी अपेक्षा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
खासदार ए.टी.पाटील, माजी आमदार आर.ओ.पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. संयोजक कैलास सूर्यवंशी यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रम स्थळी डॉ. अमोल कोल्हे यांचे आगमन होताच महिलांनी त्यांचे औक्षण केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आधी डॉ. कोल्हे यांचे पिलखोड व टाकळी प्र.दे.येथे स्वागत करण्यात आले. कैलास सूूर्यवंशी यांच्या निवासस्थानापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.