शिवाजी नगर पुलाच्या कामाच्या संथ गतीवरून मक्तेदाराला खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:16 AM2021-05-22T04:16:00+5:302021-05-22T04:16:00+5:30
शिवाजी नगर उड्डाणपुलाची केली पहाणी : नागरिकांना पायी येण्या-जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी : पादचाऱ्यांसाठी ...
शिवाजी नगर उड्डाणपुलाची केली पहाणी : नागरिकांना पायी येण्या-जाण्यासाठी रस्ता तयार करण्याच्या सूचना
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी : पादचाऱ्यांसाठी रस्ता तयार करण्याची सुचना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन वर्षांची मुदत संपूनही शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण न केलेल्या मक्तेदाराला शुक्रवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलेच खडसावले. कामाला इतका विलंब का, काम कधी पूर्ण होणार,कामात प्रगती का नाही, पुलाचे काम विलंबाने होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याचे काय? यासह अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मक्तेदाराच्या अभियंत्यांना धारेवर धरून संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्यामुळे उड्डाणपूलाच्या जागेमध्येच पादचारी व दुचाकी वाहन धारकांसाठी तात्पुरता रस्ता तयार करण्याचीही सूचना मक्तेदाराला केली. शहरातील जीर्ण झालेल्या शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. सध्या कोरोनामुळे पुलाचे काम बंद असल्याने, पुलाच्या कामासाठी गेल्या एक वर्षापासून बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा उघडण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेतली होती. यावेळी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुलाचे सुरू असलेले विलंबाने काम व यामुळे नागरिकांना शिवाजी नगरात जाण्यासाठी कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागत आहे, या बाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.या प्रकारावरून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्रसिंग राजपूत व सहाय्यक अभियंता सुभाष राऊत यानी शुक्रवारी दुपारी बारा वाजता अचानक शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता व सबंधित मक्तेदाराचे अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते.
इन्फो :
कामाची पाहणीकरून मक्तेदारावर नाराजी
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे अर्धा तास कामाची पाहणी करून, सध्या स्थितीला सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांना दोन वर्षात उड्डाण पुलाचे पाहिजे तसे काम झालेले दिसून आले नाही. यावेळी उड्डाण पुलाचे काम करणारे मक्तेदार आदित्य खटोड कामाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सबंधित मक्तेदाराचे अभियंते व तेथील सुपरवायझर यांच्याकडून पुलाच्या कामाची माहिती जाणून घेतली. मात्र, पुलाच्या कामाच्या पाहणीच्या वेळी अतिशय संथ गतीने काम सुरू असल्याचे दिसून आल्यावर गजेंद्र राजपूत यांनी मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जानेवारी पासून एकच गर्डरचे काम सुरू असून, तेदेखील पूर्ण झालेले दिसून येत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
इन्फो :
दोन दिवसांत पादचाऱ्यांसाठी रस्ता तयार करण्याचे आदेश
पुलाच्या कामामुळे शिवाजी नगरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यात पुलाच्या कामासाठी वर्षभरापासून बंद करण्यात आलेले रस्ते सुरू करण्याची मागणी गुप्ता यांनी यावेळी केली. यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी पादचारी नागरिक व दुचाकी वाहने जातील,अशा प्रकारचा रस्ता सुरु करून, तो दोन दिवसात सुरू करण्याची सूचना सबंधित मक्तेदाराला केली.
इन्फो :
शुक्रवारी दुपारी शिवाजी नगर उड्डाणपुलाची पाहणी केली. पुलाच्या काम दिरंगाईने होत असल्याबाबत मक्तेदाराशी बोललो, तसेच त्यांना वेगाने काम करण्याचेही सांगितले. तसेच शिवाजी नगरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पुलाच्या ठिकाणी एक लहान रस्ता तयार करण्याचेही मक्तेदाराला सांगितले आहे.
गजेंद्रसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग