फेब्रुवारीपासून शिवाजीनगर उड्डाणपूल वाहतुकीस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:56 PM2019-01-19T12:56:14+5:302019-01-19T12:56:21+5:30
मुहूर्त मिळाला
जळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवाजीनगर उड्डाणपूलाचे कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आता ५ फेब्रुवारीपासून शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या बांधकामास सुरुवात होणार असून, १ फेब्रुवारीपासून हा पूल कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, या पुलाचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वेने निश्चित केलेल्या ‘टी’ आकारातच होणार आहे.
या पुलाच्या बांधकामाबाबत गुुरवारी रेल्वे प्रशासनाने महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली आहे. १ फेबु्रवारीपासून पायदळसह इतर वाहतुकीसाठी देखील हा पूल बंद करण्यात येणार आहे. तसेच जो पर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही तोवर हा पुल बंद ठेवण्यात येणार असल्याचीही माहिती या पत्राव्दारे दिली आहे.
‘टी’ आकारातच होणार पुल
शिवाजीनगर उड्डाणपूलाचे बांधकाम ‘टी’ आकारातच प्रस्तावित करण्यात आल्यामुळे या आराखड्याला शिवाजीनगरवासियांनी विरोध केला होता. शिवाजीनगरवासियांनी या संदर्भात एक दिवसीय उपोषण देखील पुकारले होते. पुल ‘टी’ आकारात न करता ‘वाय’ आकारात करण्याची मागणी केली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी हा पूल सार्वजनिक बांधकाम व रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या ‘टी’ आकारातच करण्याचा सूचना दिल्यामुळे आता हा पूल ‘टी’ आकारातच करण्यात येणार आहे.
दुध फेडरेशन व लेंडी नाल्याकडून वाहतूक करणार
शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम अंदाजे दोन वर्ष चालण्याची शक्यता आहे. कानळदा, भोकर, यावल, चोपडा या गावांकडून होणारी सर्व वाहतुक दुध फेडरेशन, शनिपेठ भागातील लेंडी नाल्याचा रस्त्याकडून वळविण्यात येणार आहे. तसेच शहरात येण्यासाठी सुरत रेल्वेगेटकडून जुन्या महामार्गाकडून गुजरात पेट्रोलपंपकडील रस्ता, बजरंग बोगद्याकडून व सुरत रेल्वेगेटकडून मालधक्कयाकडील रस्त्याचा पर्याय वाहतुकीसाठी देण्यात येणार आहे.